12 August 2020

News Flash

लष्कराच्या शोधपथकात पहिल्यांदाच देशी वाणाचे श्वान

कर्नाटकी ‘मुधोळ हाऊंड’ कुत्र्यांचे प्रशिक्षण सुरू

(संग्रहित छायाचित्र)

भक्ती बिसुरे

पठाणकोटमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा माग काढणे असो, जागतिक दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या बगदादीचा खात्मा आणि ओसामा बिन लादेनला संपवण्याचा कट, या मोहिमा यशस्वी होण्यात श्वान पथकातील श्वानांचे योगदान अनन्यसाधारण ठरले. भारतीय लष्कराच्या श्वान पथकात सध्या जर्मन शेफर्ड आणि लॅब्रेडोर कुत्रे समाविष्ट आहेत. लवकरच या पथकांमध्ये कर्नाटकी मुधोळ हाऊंड श्वान दाखल होणार असून देशसेवेत दाखल होणारे हे पहिले भारतीय वाणाचे कुत्रे ठरणार आहेत.

सन १९५९ मध्ये अस्तित्वात आलेल्या भारतीय लष्कराच्या श्वान पथकात आजघडीला सुमारे एक हजार प्रशिक्षित श्वान संरक्षण यंत्रणांना साहाय्य करतात. भूसुरुंग आणि ज्वालाग्राही स्फोटकांचा माग काढण्याबरोबरच दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग घेऊन पळालेल्या किंवा दडून बसलेल्या दहशतवाद्यांचा छडा लावण्यापर्यंत अनेक महत्त्वाच्या कामगिरीत श्वान पथकांचे योगदान असते.

सद्य:स्थितीत, लॅब्रेडोर आणि जर्मन शेफर्ड या दोन परदेशी जातींचे कुत्रे भारतीय लष्करी सेवेत आहेत. कर्नाटक मुधोळ हाऊंड जातीच्या कुत्र्यांची चपळता आणि वेग ही मुख्य वैशिष्टय़ं आहेत. ‘कारवानी’ या नावाने देखील ते ओळखले जातात. पारंपरिक शिकारी तसेच राखणदार कुत्रे म्हणून ते ओळखले जातात. गेल्या दोन वर्षांपासून त्यांचे प्रशिक्षण सुरू आहे, मात्र नवीन जातीचे कुत्रे लष्करी श्वानपथकात दाखल करण्यासाठी अनेक निकष आणि चाचण्या असल्याने ही प्रक्रिया काहीशी वेळखाऊ आहे. खडतर प्रशिक्षणानंतर मुधोळ हाऊंड कुत्रेदेखील लॅब्रेडोर आणि जर्मन शेफर्डप्रमाणेच किंबहुना त्यापेक्षा उत्तम कामगिरी करू शकतील, असे वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते.

ले. जनरल (निवृत्त) डी. जी. शेकटकर म्हणाले, की प्रत्येक जातीच्या कुत्र्याचे काही ना काही वैशिष्टय़ असते. देशी कुत्रा कोणत्याही बाबतीत विदेशी कुत्र्यांपेक्षा कमी असतो असे नाही. लष्करातर्फे कर्नाटक मुधोळ हाऊंड प्रशिक्षित केले जात आहेत. त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आणि त्यांच्या क्षमतांचा अंदाज आल्यानंतर त्यांना श्वान पथकात समाविष्ट केले जाऊ शकते. पठाणकोटवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्याचा छडा लावण्यात ‘रॉकेट’ या लॅब्रेडोरने महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सर्वज्ञात आहे.

श्वान पथकांचा इतिहास

भारतीय लष्करात १९५९ मध्ये श्वान पथकाचा समावेश करण्यात आला. ‘रिमाउंट व्हेटर्नरी कोअर’ आणि महाविद्यालय मेरठतर्फे या श्वानांना प्रशिक्षण दिले जाते. श्वान पथकांना शौर्यचक्र आणि सुमारे १५० सन्मानपत्रांनी (कमेंडेशन कार्डस्) गौरवण्यात आले आहे. सैन्यात दाखल होणाऱ्या जवान आणि अधिकाऱ्यांप्रमाणेच श्वानांचे प्रशिक्षणही खडतर असते. २०१६ मध्ये प्रजासत्ताक दिन संचलनात सहभागी होण्याचा सन्मानही रिमाऊंट व्हेटर्नरी कोअरच्या श्वानांना मिळाला आहे.

मुधोळ हाऊंडची वैशिष्टय़े

* कर्नाटकमधील मुधोळ येथील वाण म्हणून हे श्वान ‘मुधोळ हाऊंड’ म्हणून ओळखले जातात.

* शिडशिडीत शरीरयष्टी, नजरेत भरणारी उंची, चपळता, वेगवान हालचाली, शिकारी कौशल्ये.

* इंग्लंडच्या पाचव्या किंग जॉर्जला कर्नाटकच्या महाराजांकडून १९००च्या दशकात मुधोळ हाऊंड जोडी भेट.

* मुधोळ हाऊंडचे छायाचित्र असलेले टपाल तिकीट २००५मध्ये प्रकाशित.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2019 1:50 am

Web Title: first time in a military search indigenous varieties dog abn 97
Next Stories
1 टेमघर दुरुस्ती डिसेंबरअखेर
2 मुठा उजवा कालवा दुरुस्तीच्या उर्वरित कामांना प्रारंभ
3 अत्याचार प्रकरणातील पीडितांना आधार; ३४ लाख रुपयांची नुकसान भरपाई
Just Now!
X