कोळणीच्या टोपलीतून स्वयंपाकघरात आणि त्यानंतर ताटात या प्रवासासाठी प्रसिद्ध असलेली कोळंबी (श्रिम्प) घरातल्या दिवाणखान्यात कौतुकाने मिरवेल किंवा पावसाळ्यात रस्ता, गच्ची, अंगण येथे दिसणाऱ्या गोगलगायीच्या (स्नेल) भाईबंधांना हजारो रुपये खर्चून घरात आणले जाईल यावर दहा वर्षांपूर्वी कुणीही विश्वास ठेवला नसता. कोळंबी, गोगलगायी, खेकडे कौतुकाने पाळणाऱ्या मत्स्यपालकांना वेडय़ात काढले असते. दहा-पंधरा वर्षांपूर्वी मध्यमवर्गीय भारतीय घराच्या स्वप्नातही नसणारे हे प्राणी आता दिवाणखान्यातील मत्स्यपेटय़ांमध्ये विराजमान झाले आहेत.

नवे सवंगडी

घरांच्या कमी होणाऱ्या आकारमानाबरोबरच मत्स्यपेटीचे आकारमानही कमी होत जाणे हे स्वाभाविक होते. कोळंबी पालनाचा ट्रेंड मोठा होण्यात त्यांना लागणारी कमी जागा हा मुद्दा बऱ्याच अंशी महत्त्वाचा ठरला. अगदी लहान पेटीतही कोळंबी राहू शकते. ‘रेड चेरी श्रिम्प’ , ‘क्रिस्टल श्रिम्प’, ‘अमानो श्रिम्प’, ‘घोस्ट श्रिम्प’ अशा कोळंबीच्या अनेक प्रजाती शोभेच्या माशांइतक्याच देखण्या आणि आकर्षक असतात. त्याची पैदासही तुलनेने लवकर होते. आतापर्यंत परदेशात मिळणाऱ्या या प्रजाती आता भारतातही सहज मिळू लागल्या आहेत. ऑनलाईन बाजारात तर अनेक पर्याय उपलब्ध असलेले दिसतात. त्याचप्रमाणे त्यांची किंमतही आवाक्यातील असते. अगदी शंभर रुपयांपासून कोळंबी मिळू शकते. गोगलगायी पाळणे हा असाच वाढत चाललेला दुसरा ट्रेंड. गोगलगायींकडे अगदी तीन-चार वर्षांपूर्वीपर्यंत भारतीय मत्स्यपालक डोक्याला ताप म्हणून पाहत होते. भरघोस पैदास होणाऱ्या या गोगलगायी मेहनतीने वसविलेल्या फिशटँकमधील वनस्पतींना खातात म्हणून त्यांना मारण्यासाठी लोच (टायगर लोच) प्रजातीचे मासे टँकमध्ये खासकरून आणले जात होते. पण आता रंगीत आणि विविध आकाराच्या गोगलगायींना विकत आणण्याकडे कल वाढला आहे. किंमत जास्त असली तरी आकर्षक रंग आणि मत्स्यपेटी स्वच्छ ठेवण्याची खुबी यासाठी त्या पाळल्या जातात. विशेषत: खाऱ्या पाण्याच्या मत्स्यपेटीत माशांबरोबर एखादी गोगलगाय आवर्जून बाळगली जाते. ‘अ‍ॅपल स्नेल’, ‘टबरे स्नेल’, ‘रेड रॅमशॉर्न स्नेल,’ ‘गोल्डन स्नेल’ या प्रजाती भारतातही मिळू लागल्या आहेत. शेवाळ खाणे, काही वनस्पतींची वाढ आटोक्यात ठेवणे यासाठी गोगलगायींचा उपयोग होतो. त्याचबरोबर खेकडे बाळगण्याच्या ट्रेंडची सुरुवातही भारतात झाली आहे.

परिसंस्थेची उभारणी

दिवाणखान्याची शोभा वाढविण्यासाठी नव्वदीच्या दशकांत घराघरांत दाखल झालेली मत्स्यपेटी (अ‍ॅक्वेरिअम) केवळ रंगीबेरंगी माशांपुरती मर्यादित होती. सुरुवातीला विविध प्रकारची रोषणाई आणि समुद्र किंवा नदीचे वातावरण वाटणारे आभासी देखावे तयार करण्यापर्यंत मत्स्यपालकांच्या हौसे-मौजेची उडी होती. माशांचे प्रकारदेखील स्वस्तात मिळणाऱ्या रंगीत माशांपर्यंत ठरलेले असत. मात्र गेल्या दशकभरामध्ये मत्स्यपालक आपल्या घराची रचना बदलून वास्तव समुद्रस्थिती निर्माण करणारी अजस्त्र फिशटॅँक्स तयार करीत आहेत किंवा गोडय़ापाण्यात वनस्पतींची पैदास करून त्यात पाळलेल्या माशांना नैसर्गिक वातावरण बहाल करीत आहेत. हजारो-लाखो रुपयांची आर्थिक गुंतवणूक करून कृत्रिमरीत्या तयार केलेल्या या जलपरिसंस्थेत गोल्डफिश, डिस्कस, अर्वाना, टेट्राज या देखण्या माशांना सर्वाधिक पसंती आहे. फक्त मासे न पाळता वनस्पती आणि इतर जलचर पाळून नैसर्गिकरीत्या सर्व टँक स्वच्छ राहील यादृष्टीने त्याची रचना केली जाते आणि प्रजाती आणि प्राण्यांची निवड केली जाते.

वास्तुशास्त्राचा प्रभाव

वास्तुशास्त्र, फेंगशुईतील दाखल्यांमुळे मत्स्यबाजारपेठेला गेल्या दोन दशकांत खूप उभारी आली आहे. मत्स्यपालनाच्या हौसेची सुरुवात बहुतेकवेळा गोल्डफिशपासूनच होते. या माशाची खरेदी फेंगशुईमुळे मोठय़ा प्रमाणात होते. छोटय़ा टँकमध्ये तीनच्या संख्येने हे मासे ठेवल्यास भरभराट होते असा समज पसरला. याशिवाय अरवाना या प्रचंड वाढ होणाऱ्या माशाला वास्तुशास्त्राचा आधार मिळून तो लोकप्रिय झाला. त्याचे आयुष्यही खूप असते. त्यामुळेही मत्स्यपालकांचा कल या माशाच्या पालनाकडे आवर्जून असल्याचे दिसते. त्याचप्रमाणे डिस्कस, टेट्राज या प्रजाती त्याचप्रमाणे फ्लॉवर हॉर्न या प्रजातींनाही मागणी आहे.

‘सध्या हौशी मत्स्यपालक संपूर्ण परिसंस्था उभी करण्याचा विचार करतात. त्यामध्ये माशांबरोबरच कोळंबी, गोगलगायी यांचाही समावेश असतो. परिसंस्था उभी राहिली तर मत्स्यपेटी अधिक काळ स्वच्छ राहू शकते. कोळंबीला जागा कमी लागत असल्यामुळे तिलाही मागणी आहे. या सर्व प्रक्रियेत माशांची किंवा झाडे इतर जलचर यांच्या प्रजातींची योग्य निवड करणे आवश्यक असते. सध्या अगदी हजारो रुपये खर्चून माशांची खरेदी करण्यासाठी हौशी नागरिक तयार असतात. सुरुवातीला गोडय़ा पाण्याची मत्स्यपेटी किंवा छोटय़ा जलचरांची मत्स्यपेटी तयार करावी. मात्र मासे पाळण्याबाबत थोडी माहिती झाली असेल तर अशांसाठी खाऱ्या पाण्याची मत्स्यपेटी तयार करण्याचा सल्ला आम्ही देतो,’ असे ‘सुजीत अ‍ॅक्व्ॉरियम’चे सुजीत रेमभोतकर यांनी सांगितले.