कोथरुड विधानसभा मतदार संघाच्या भाजपाच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी गेले काही दिवस पक्षावर नाराज असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. २०१९ विधानसभा निवडणुकीत पक्षाने मेधा कुलकर्णी यांचा पत्ता कापत त्यांच्या जागेवर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली. यानंतर पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपाकडून उमेदवारी मिळणं अशक्य असल्यामुळे मेधा कुलकर्णी मनसेकडून नव्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणार अशी माहिती समोर येत होती. परंतू सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये पसरलेल्या बातम्यांवर मेधा कुलकर्णी यांनी लोकसत्ता ऑनलाईनशी बोलताना महत्वाची माहिती दिली आहे.

प्रसारमाध्यमांत माझ्याबद्दल ज्या बातम्या किंवा संदेश फिरत आहेत त्यामध्ये काहीही तथ्य नाही. भारतीय जनता पार्टी माझ्याबद्दल जो काही निर्णय घेणार असेल तो मला मान्य आहे. पक्षाकडून जे आदेश येतील त्यानुसार मी माझी कामं करणार आहे. पदवीधर मतदारसंघासाठी सध्या नोंदणी उपक्रम हातात घेतला असून यापुढेही पक्षाच्या ध्येय धोरणांप्रमाणेच काम करत राहणार असल्याचं मेधा कुलकर्णींनी स्पष्ट केलं.

सोमवारी पुण्यात कोथरुडचे आमदार आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वार्षिक कार्यअहवालाचे प्रकाशन झाले. या कार्यक्रमाला मेधा कुलकर्णी या अनुपस्थित होत्या. या कार्यक्रमानंतरच मेधा कुलकर्णी नाराज असल्याच्या चर्चा पुण्यात रंगत होत्या. या कार्यक्रमाचं निमंत्रण देऊनही कुलकर्णी हजर न राहिल्यामुळे चर्चेला अधिकच उधाण आलं होतं. लोकसत्ता ऑनलाईनशी बोलताना यावर अधिक प्रतिक्रिया देण्यास कुलकर्णी यांनी नकार दिला. हा पक्षांतर्गत मुद्दा असून याबद्दल मला प्रसारमाध्यमांशी बोलायचं नाही. आम्ही अंतर्गत तो विषय सोडू असं म्हणत कुलकर्णी यांनी या विषयावर अधिक बोलणं टाळलं.