आर्थिक दुर्बल गटातील विद्यार्थ्यांचे शुल्क भरण्यासाठी माजी विद्यार्थ्यांचा पुढाकार
पुणे : करोना प्रादुर्भावामुळे आर्थिक दुर्बल गटातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची टाळेबंदी होऊ नये म्हणून टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे. आतापर्यंत दोनशे विद्यार्थ्यांचे शुल्क माजी विद्यार्थ्यांकडून भरण्यात आले असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये खंड पडणार नाही याची खबरदारी घेत माजी विद्यार्थ्यांनी नकळतपणे या विद्यार्थ्यांवर सामाजिक मदतीचा संस्कार रुजविला आहे.
करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे शालेय विद्यार्थ्यांचे गेल्या संपूर्ण वर्षांचे शिक्षण ऑनलाइन पद्धतीने झाले. या शिक्षणात विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांपुढेही अनेक अडचणी होत्या. अनेक शाळांमधील शेकडो विद्यार्थ्यांच्या पालकांना त्याचे शुल्क भरणे शक्य झाले नाही. या समस्येवर डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी विधायक उत्तर शोधले. त्यांच्या कृतिशीलतेमुळे शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठे सहाय्य झाले.
शाळेतील आर्थिकदृष्टय़ा दुर्बल गटातील विद्यार्थ्यांच्या शुल्काचा भरणा होईल, यासाठी काय करायचे याबाबत मुख्याध्यापिका मनीषा मिनोचा यांनी एका बैठकीत सर्व शिक्षकांबरोबर चर्चा केली. माजी विद्यार्थ्यांना तसेच शाळेच्या देणगीदारांना थोडा हातभार लावण्यासंदर्भात विनंती करण्यावर एकमत झाले. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांना ही कल्पना आवडली. शाळेतून १९६७ मध्ये एसएससी झालेल्या तुकडीतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत १०६ विद्यार्थ्यांचे शुल्क भरले. अधिकाधिक विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ मिळावा या उद्देशातून माजी विद्यार्थी, देणगीदारांनी विद्यार्थ्यांचे निम्मे शुल्क भरावे तर, उर्वरित शुल्क पालकांनी भरावे, असे ठरविण्यात आले. त्याला पालकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला. ‘तुम्ही शिकून मोठे व्हाल, तेव्हा आपल्याला देखील असे काही चांगले काम करायचे आहे हे सदैव लक्षात ठेवा’, अशी शिकवण या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना दिली जात आहे.
मदतीचे आवाहन
फग्र्युसन महाविद्यालय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेने शाळेतील २५ विद्यार्थ्यांचे शुल्क भरत आपले योगदान दिले. देणगी स्वीकारण्याचे सर्व व्यवहार ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले. त्यामुळे ती कल्पनाही सर्वाना खूपच आवडल्याचे शाळेतील गणित व विज्ञानाचे शिक्षक आणि या उपक्रमाचे संयोजक प्रवीण रांगोळे यांनी सांगितले. गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत करू इच्छिणाऱ्यांनी ९९२२३११६९५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.