‘सीएसआयआर’चे महासंचालक  डॉ. शेखर मांडे यांची माहिती

पुणे : राज्यातील करोना रुग्णवाढीचा वेग पाहता विषाणूतील कोणत्या बदलामुळे (उत्परिवर्तन) हे घडते, याचा अभ्यास करण्यासाठी करोना चाचणीतून प्राप्त होणाऱ्या नमुन्यांची जनुकीय क्रमवारी तपासणी होणे आवश्यक आहे. त्यासाठी पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतही (एनसीएल) जनुकीय क्रमवारी तपासणी (जिनोम सिक्वे न्सिंग) सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती भारतीय वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी दिली.

डॉ. मांडे यांनी रविवारी दूरसंवादाच्या माध्यमातून देशातील विविध संस्थांमध्ये सुरू असलेल्या करोना विषयक संशोधनाची माहिती दिली, तसेच राज्यातील संसर्गाच्या वेगाला आळा घालण्यासाठी सद्यस्थितीत रात्र संचारबंदी, टाळेबंदीला पर्याय नसल्याचे स्पष्ट केले.

डॉ. मांडे म्हणाले, देशात दैनंदिन आढळणाऱ्या नवीन रुग्णसंख्येपैकी निम्मी रुग्णवाढ महाराष्ट्रातील आहे. याचे एक कारण राज्यात आंतरराष्ट्रीय प्रवास करून येणारे नागरिक मोठय़ा प्रमाणात आहेत, हे आहे. राज्यातील रुग्णवाढीला कारणीभूत विषाणू उत्परिवर्तन कोणते, याचा अभ्यास करण्यासाठी जनुकीय क्रमवारी तपासणीचे प्रमाण वाढवले जाणार आहे. राज्यातील सर्व जिल्ह्य़ांनी त्यासाठी नमुने संकलन कसे करावे याच्या सूचना राज्य सरकारला पाठवत असल्याचेही त्यांनी सांगितले.

लस घेणे महत्त्वाचेच

देशात सध्या वेगवान लसीकरण सुरू आहे. हे लसीकरण विषाणू उत्परिवर्तनावर परिणामकारक ठरेल किंवा नाही हे अद्याप सिद्ध झालेले नाही, मात्र झालेल्या संसर्गाची तीव्रता कमी ठेवणे आणि जीवितहानी रोखणे यासाठी लस महत्त्वाची आहे. त्यामुळे जे नागरिक पात्र आहेत त्यांनी लस घ्यावी, असा आग्रह डॉ. मांडे यांनी के ला. काही नागरिकांना दुसऱ्यांदा झालेला संसर्ग ‘री इन्फेक्शन’ आहे, यावर आरटीपीसीआर चाचणीतून तसेच जनुकीय क्रमवारी तपासणीतून शिक्कामोर्तब झाले आहे, मात्र याचे प्रमाण अत्यल्प आहे, तरी नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाय कटाक्षाने पाळावेत, असे आवाहनही त्यांनी के ले.

‘महाराष्ट्राने नेतृत्व करावे’

आजपर्यंत अनेक संकटांच्या काळात महाराष्ट्राने देशाला दिशा देण्याचे काम के ले. ते पुन्हा करण्याची गरज आहे. नागरिकांनी मुखपट्टी वापरणे, अंतर राखणे, सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन कटाक्षाने टाळणे आवश्यक आहे. पुढील किमान एक ते दोन वर्षे सर्व निर्बंध पाळून जीवन पूर्ववत करणे हाच उपाय असल्याचे डॉ. मांडे म्हणाले.