गिरीश बापटांचे पुन्हा वादग्रस्त विधान
काय आहेत त्या मागण्या आत्ताच करून घ्या, पुन्हा सत्ता येईल की नाही सांगता येत नाही, या विधानामुळे वादग्रस्त ठरलेल्या पालकमंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी महापालिकेच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा तसेच विधान केल्यामुळे त्याची चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राजकारणात पुढे काय होईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे सत्ता असेपर्यंत कामे पूर्ण करून घ्या, असा सल्ला त्यांनी महापालिकेच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना दिला. त्यांच्या या विधानामुळे पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
बापट यांनी काही दिवसांपूर्वी शेतीसंबंधीच्या एका मेळाव्यात वादग्रस्त विधान केले होते. संघटनांनी त्यांच्या मागण्या आत्ताच करून घ्याव्यात, पुन्हा सत्ता येईल की नाही हे सांगता येणार नाही, असे बापट त्या मेळाव्यात म्हणाले होते. त्यांच्या या विधानाची विरोधी पक्षांनी जोरदार खिल्ली उडविली होती. तशाच स्वरूपाचे विधान त्यांनी शुक्रवारी महापलिकेच्या कार्यक्रमात केले.
महापालिकेच्या वतीने सेव्हन लव्हज् हॉटेल ते वखार महामंडळ या दरम्यान उड्डाणपुलाला मंजुरी देण्यात आली आहे. या उड्डाणपुलाच्या कामाचे भूमिपूजन शुक्रवारी पालकमंत्री बापट यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना सत्ता आहे तोपर्यंत कामे करून घ्या, असा सल्ला त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिला. राजकारणात पुढे कधी काय होईल, हे माहीत नसते. उड्डाणपुलाचे भूमिपूजन झाले. पण हे काम पूर्ण झाल्यावर उद्घाटनाला मलाच बोलवा. आता एक वर्ष राहिले आहे. सत्ता आहे तोपर्यंत कामे करून घ्या, असे ते म्हणाले. या विधानामुळे पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये उलट-सुलट प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली. भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, महापौर मुक्ता टिळक, आमदार माधुरी मिसाळ, सभागृहनेता श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
.. तर भाजपमध्ये ये, तुला नोकरी देतो
भाषणादरम्यान, मोबाइलवर बोलणाऱ्या एका तरुणाला उद्देशून बापट यांनी, कोणाशी पत्नीशी बोलतो आहेस का, अशी विचारणा केली. त्यावर विवाहित नसल्याचे तरुणाने सांगताच, लग्न नाही झाले तर तू भाजपमध्ये ये. तुला नोकरी देतो, रोजगार देतो, असे बापट म्हणाले. त्यांच्या या मिश्किल पण वादग्रस्त विधानामुळे विरोधकांकडूनही त्यांच्यावर टीका सुरू झाली आहे.