नऊ महिन्यांपूर्वी महापुरात वाहून गेलेली भिंत

पुणे : आंबिल ओढय़ाला आलेल्या महापुरामुळे ओढय़ावरील संरक्षक भिंत कोसळून सातारा रस्त्यावरील गुरुराज सोसायटीची मोठी वाताहत झाली होती. महापुरात वाहून गेलेली सीमाभिंत नऊ महिन्यांच्या कालावधीनंतरही महापालिकेला बांधता आली नसल्यामुळे गुरुराज सोसायटीसह अन्य सोसायटय़ांना यंदाही पावसाळ्यात पुराचा धोका कायम राहण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, खासगी सोसायटीतील सीमाभिंत बांधण्याचा खर्च महापालिके ला देता येणार नाही. सोसायटय़ांनीच तो करावा, अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे.  त्यामुळे पावसाळ्याच्या तोंडावर या परिसरातील नागरिकही धास्तावले असल्याचे चित्र आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आंबिल ओढय़ाला महापूर आला. या महापुरात सातारा रस्त्यावरील अनेक सोसायटय़ांना त्याचा फटका बसला. ओढय़ालगतच्या इमारतींच्या सुरक्षिततेसाठी उभारण्यात आलेल्या सीमाभिंत महापुराच्या पाण्यात वाहून गेल्या. सातारा रस्त्यावरील गुरुराज सोसायटीलाही त्याचा फटका बसला. पुराचा जोर ओसरल्यानंतर तत्कालीन आयुक्त सौरभ राव, महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी या भागाची पाहणी के ली होती. त्यावेळी खासगी सीमाभिंत बांधण्यासाठी राज्य शासनाकडे निधी मागितला जाईल आणि  पालिकके डून सोसायटय़ांना मदत के ली जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र नऊ महिन्यांनंतरही सीमाभिंत उभी राहू शकली नसल्याचे चित्र पुढे आले आहे.

गुरुराज सोसायटीला पुराचा मोठा फटका बसला होता. पुराचे पाणी पहिल्या मजल्यापर्यंत आले होते. अनेकांच्या दुचाकी, चारचाकी गाडय़ांचेही मोठे नुकसान झाले होते. ओढय़ावरील सीमाभिंत ही महापालिके चीच आहे. त्यामुळे महापालिके ने ती उभारावी, अशी भूमिका स्थानिक रहिवाशांनी घेतली होती. प्रारंभी महापालिके नेही त्याला प्रतिसाद दिला होता. त्यासाठी रहिवाशांकडून सातत्याने पाठपुरावाही करण्यात आला. मात्र महापालिके कडून त्याबाबतची  कार्यवाही करण्यास टाळाटाळ सुरू झाली. सध्या करोनाच्या संकटामुळे महापालिके ला आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे आता खासगी कामांना निधी देता येणार नाही, अशी भूमिका महापालिका प्रशासनाकडून घेण्यात आली आहे. मात्र ही भिंत ओढय़ावर असून ती महापालिके ची आहे, असा दावा रहिवासी करत आहेत.

सीमाभिंत पाडल्यानंतर तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील, स्थानिक नगरसेवक, महापौर, महापालिके चे अधिकाऱ्यांनी सातत्याने या भागाची पाहणी के ली. सीमाभिंत उभारणीचे काम पंधरा एप्रिलपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते, असे स्थानिक रहिवासी प्रवीण नानगुडे यांनी सांगितले. सध्या सोसायटीच्या सभासदांकडून काही वर्गणी संकलीत करण्यात येत आहे. सोसायटीकडून अनुषंगिक कामे करण्यात येणार आहेत. सीमाभिंत उभारणीचा खर्च कोटीच्या घरात आहे. हा खर्च सोसायटीला झेपणारा नाही. त्यामुळे महापालिके नेच सीमाभिंत उभारावी, असेही नानगुडे यांनी सांगितले. दरम्यान,  त्यावेळी पावसाळ्यातील धोका लक्षात घेऊन सीमाभिंत उभारणीचे काम महापालिके कडून के ले जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. प्रत्येक पाहणी दौऱ्यावेळी हे आश्वासन देण्यात आले. मात्र अद्यापही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे सोसायटीतील नागरिकांना पुराचा धोका संभवत आहे, असे रहिवासी राजेंद्र देशपांडे यांनी सांगितले.

आंबिल ओढय़ाच्या साफसफाईची कामे महापालिके कडून सुरू झाली आहेत. सध्या ३३ टक्के च कामे करण्यास राज्य शासनाने महापालिके ला कळविले आहे. त्यानुसार कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. संबंधित सोसायटीची ती खासगी जागा आहे. खासगी जागेत महापालिकेला खर्च करता येत नाही. त्यामुळे सीमाभिंत सोसायटीलाच बांधावी लागेल. राज्य शासनाकडे निधी देण्यासंदर्भात प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र त्याला मान्यता मिळालेली नाही.

– प्रवीण गेडाम, अधीक्षक अभियंता, मलनि:स्सारण विभाग