जवानांच्या बहिष्कारामुळे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

पुण्यातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीच्या बंदोबस्तात पोलिसांच्या बरोबरीने काम करणाऱ्या गृहरक्षक दलातील (होमगार्ड) जवानांनी यंदाच्या गणेशोत्सव बंदोबस्तावर बहिष्कार घातला आहे. उत्सवात या जवानांचे योगदान महत्त्वाचे असते. मात्र, कोणतीही पूर्वसूचना न देता वर्षभरापासून होमगार्ड जवानांना सेवेतून काढून टाकण्यात आल्याने इतर जवानांनी बंदोबस्तावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे होमगार्डचा विचार करता यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत अपुऱ्या मनुष्यबळाची कमतरता जाणवणार आहे.

आपत्कालीन परिस्थितीत, तसेच सण, उत्सवाच्या बंदोबस्तात होमगार्ड जवान महत्त्वाची भूमिका बजावतात. पोलिसांच्या बरोबरीने बंदोबस्त पार पाडणारे होमगार्ड जवान ही मानद सेवा मानली जाते. सरकारकडून त्यांना प्रत्येक दिवसाला चारशे रुपये भत्ता दिला जातो. देशप्रेम आणि पोलीस सेवेची आवड असलेले अनेक जण होमगार्ड जवान म्हणून काम करतात. काही जण अर्धवेळ नोकरी करतात. मात्र, गेल्या वर्षभरापासून राज्यातील सुमारे वीस हजार जवानांना कोणतीही पूर्वसूचना न देता काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे राज्यभरातील जवानांनी ठिकठिकाणी आंदोलने करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र, अद्याप या प्रश्नी कोणताही तोडगा निघाला नाही.

पुणे शहर आणि जिल्ह्य़ातील सुमारे दोन हजार जवानांना तडकाफडकी काढून टाकण्यात आले आहे. प्रत्यक्षात शहर आणि जिल्ह्य़ासाठी चार हजार जवानांचे मनुष्यबळ मंजूर आहे. यंदाच्या गणेशोत्सवात पुणे पोलीस आयुक्तालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाने होमगार्डचे महासमादेशक आयपीएस अधिकारी राकेश मारिया यांच्याकडे मनुष्यबळाची मागणी केली होती. मात्र, होमगार्डची संख्या अपुरी असल्याने पोलिसांना मागणीएवढे मनुष्यबळ देण्यात आलेले नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनापुढे समस्या निर्माण झाली आहे, असे जिल्हा होमगार्ड समितीचे सदस्य वीरेन साठे यांनी सांगितले.

प्रशिक्षित, कर्तव्यदक्ष आणि पंचावन्न वर्षांच्या आतील होमगार्ड जवानांना तडकाफ डकी काढून टाकण्यात आलेले आहे. या प्रश्नाबाबत जिल्हा होमगार्ड समितीने सातत्याने पाठपुरावा केला. मात्र, पुणे जिल्हा होमगार्ड प्रशासनाने अद्यापही या प्रश्नाची दखल घेतलेली नाही. त्यांनी कोणतीही भूमिका न घेतल्यामुळे अनेक प्रामाणिक होमगार्ड जवानांवर अन्याय झाला आहे.

गणेशोत्सवात बंदोबस्तात महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या होमगार्डला बंदोबस्तातून डावलण्यात आले आहे. त्यामुळे पोलिसांना आवश्यकतेएवढे मनुष्यबळ मिळू शकलेले नाही. त्याचा परिणाम उत्सवातील बंदोबस्त आणि पर्यायाने बंदोबस्तातील महत्त्वाचा भाग असलेल्या विसर्जन मिरणवणुकीवर होण्याची शक्यता आहे, असेही साठे यांनी निदर्शनास आणून दिले. या संदर्भात साठे, जितेंद्र राऊत, अजय मोहोळ, अंकुश पानसरे, विकास शिंगे यांनी जिल्हाधिकारी सौरभ राव यांनाही निवेदन दिले आहे.

गणेशोत्सव बंदोबस्त आणि विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांनी होमगार्ड प्रशासनाकडे मनुष्यबळाची मागणी केली होती. त्यानुसार पोलिसांना मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. सध्या तरी बंदोबस्तात होमगार्ड जवानांची कमतरता भासत नाही.

– सुधीर हिरेमठ, पोलीस उपायुक्त परिमंडल एक