शेतांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने भातपिकांसह इतर पिकांचे नुकसान
पुणे : जिल्ह्य़ातील घाटमाथ्यावर गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच शेतांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने भातपिकांसह इतर पिकांचे नुकसान झाले आहे.
जिल्हा प्रशासनाकडून गुरुवारी ही माहिती देण्यात आली. आंबेगाव तालुक्यातील कोलतावडे येथे गावाच्या रस्त्यावर दरड कोसळल्याने मुख्य रस्ता बंद झाला होता. दरड हटवण्याचे काम करून हा रस्ता पुन्हा खुला करण्यात आला आहे. गोऱ्हे खुर्द आणि बुद्रुक, उगलेवाडी, कोलतावडे, डिंभे खुर्द व बुद्रुक, कानसे या गावांमध्ये अतिवृष्टीमुळे ओढय़ांना पूर आला.
परिणामी लगतच्या शेतजमिनींच्या बांधांचे नुकसान झाले आहे. तसेच काही ठिकाणी पुलांचे नुकसान झाले आहे. भोरमधील महाड मार्गावरील वरंध घाटात दरड कोसळली असून त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने काम सुरू आहे.
दरम्यान, मावळातील आपटी गेव्हंडे येथे रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात माती आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या रस्त्यावरील माती बाजूला करण्याचे काम सुरू आहे. धामणे, वडीवळे, नाणे येथील पुलावरून पाणी जात असल्याने पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मळवली स्थानक येथील आश्रमात पाणी गेले होते, परंतु तेथील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
आजीवली भागातील पुराच्या पाण्याने भातशेतीचे नुकसान झाले आहे. यासह कोळचाफे सर व मोरवे भागातील मोठय़ा प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे, असेही जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
कळमोडी धरण १०० टक्के भरले
खेड तालुक्यातील कळमोडी धरण गुरुवारी १०० टक्के भरले. त्यामुळे या धरणातून आरळी नदीत तीन हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. त्यामुळे नदीकाठच्या भागातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. नायफाड येथील मातीचा बंधारा फु टल्याने भातशेतीचे नुकसान झाले आहे. खरोशी, भिवेगाव, शेंदुर्ली, नायफाड, मंदोशी, पाभे, धुवोली, वांजळे, कु डे बुद्रुक या गावातील भातशेतीचे नुकसान झाले असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.