News Flash

पुण्यात पारपत्रधारकांची वाढती संख्या

पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनीदेखील कागदपत्रांची पडताळणी जलदगतीने करण्यासाठी पोलिसांच्या विशेष शाखेला उद्दिष्ट दिले होते.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

कागदपत्रांची पडताळणी अवघ्या सहा दिवसांत; पाच लाख नागरिकांना लाभ

पुणे शहरात पारपत्र (पासपोर्ट) धारकांची संख्या वेगाने वाढत आहे. पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या पारपत्र कागदपत्रांच्या पडताळणीचा निपटारा करण्यासाठी गेल्या वर्षभरापासून विशेष प्रयत्न करण्यात आले. पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनीदेखील कागदपत्रांची पडताळणी जलदगतीने करण्यासाठी पोलिसांच्या विशेष शाखेला उद्दिष्ट दिले होते. अवघ्या सहा दिवसांत कागदपत्रांच्या पडताळणीचे उद्दिष्ट देण्यात आल्यानंतर गेल्या वर्षभरात पाच लाख नागरिकांच्या पारपत्र कागदपत्रांची पडताळणी पोलिसांकडून करण्यात आली. त्यापैकी साडेचार लाख नागरिकांना पारपत्र मिळाले आहे.

पुणे शहरात मोठय़ा संख्येने आयटी कंपन्या तसेच शैक्षणिक संस्था आहेत. परदेशात नोकरीसाठी वा शिक्षणासाठी जाणाऱ्या युवक-युवतींची तसेच पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांची संख्या वाढती आहे. दीड वर्षांपूर्वी पारपत्र कागदपत्रांच्या पडताळणीसाठी पोलिसांना महिनाभराचा कालावधी लागत असे. नागरिकांच्या दृष्टीने ते गैरसोयीचे ठरत होते. त्यानंतर तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पारपत्र पडताळणीसाठी लागणारा कालावधी कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तशा सूचना विशेष शाखेला देण्यात आल्या. पारपत्र पडताळणीचे काम विशेष शाखेच्या परकीय नागरिक नोंदणी विभागाकडून पार पाडण्यात येते. त्यानंतर पारपत्र पडताळणीचा कालावधी २१ दिवसांवर आणण्यात आला.

ऑगस्ट महिन्यात पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर पोलिसांना कागदपत्र पडताळणीचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले. त्यानंतर २१ दिवसांचा कालावधी ८ ते १० दिवसांवर आला आणि नंतर ६ दिवसांत कागदपत्र पडताळणीचे उद्दिष्ट देण्यात आले. पोलिसांनी ६ दिवसांत पडताळणीचे उद्दिष्ट गाठले आहे. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आले, अशी माहिती विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त अशोक मोराळे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यातील कागदपत्रांच्या पडताळणीचे काम पाहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना टॅब देण्यात आला आहे. कागदपत्रांच्या पडताळणीसाठी पोलीस अर्जदाराच्या घरी जातात. अर्जदाराची इत्थंभूत माहिती टॅबवर भरली जाते. त्यानंतर ही माहिती विशेष शाखेकडे येते. ज्या नागरिकांवर कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल नाहीत, अशांच्या कागदपत्रांची पडताळणी त्वरित होते. साधारणपणे दररोज ११०० ते १२०० जणांच्या कागदपत्रांची पडताळणी पोलिसांकडून केली जाते. पडताळणी केल्यानंतर ज्यांच्यावर दखलपात्र स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत, त्यांची प्रकरणे पारपत्र कार्यालयाकडून फेटाळण्यात येतात. हे प्रमाण साधारणपणे दहा टक्के एवढे आहे, असेही मोराळे यांनी सांगितले.

साडेचार लाख नागरिकांना पारपत्र

ऑगस्ट ते डिसेंबर २०१८ या कालावधीत अडीच लाख नागरिकांच्या पारपत्र कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात पाच लाख नागरिकांच्या पारपत्र कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली आहे. कागदपत्रांच्या तपासणीनंतर गेल्या वर्षभरात साडेचार लाख नागरिकांना पारपत्र मिळाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2019 12:43 am

Web Title: increasing number of passport holders in pune
Next Stories
1 पुण्यात झोपडपट्टीला आग, १५ पेक्षा जास्त घरे जळून खाक
2 ‘रेडीरेकनर’च्या दरात यंदा वाढ नको
3 पाऊस आणि गारपिटीचीही शक्यता
Just Now!
X