पुणे आणि पिंपरीतील लाखो प्रवाशांना सेवा देणाऱ्या पीएमपीची सेवा सक्षम आणि विश्वासार्ह करणे निश्चितपणे शक्य आहे. त्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. हे करताना अडथळे तर येतीलच; पण ते पार करण्याचेही मार्ग असतात आणि नियमाबाहेर जाऊन मी कोणतेही काम करत नसल्यामुळे पीएमपी कार्यक्षम करणे मला अवघड वाटत नाही, असा विश्वास पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी सोमवारी व्यक्त केला. प्रवाशांसाठी लवकरच अ‍ॅप आणि अन्य काही सुविधा उपलब्ध करून देण्याचे सूतोवाचही त्यांनी केले.

धडाकेबाज निर्णय, त्यांची अंमलबजावणी आणि पारदर्शी कारभार यामुळे तुकाराम मुंढे या नावाभोवती वलय निर्माण झाले आहे. नवी मुंबईच्या आयुक्त पदावर कार्यरत असताना पीएमपीच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदावर त्यांची बदली करण्यात आली. पीएमपीचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी निर्णयांचा धडाका घेतानाच कर्मचाऱ्यांमध्येही शिस्त लावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पीएमपीची सूत्रे स्वीकारल्यानंतर मुंढे यांनी सोमवारी ‘लोकसत्ता’ कार्यालयाला भेट दिली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी भविष्यातील नियोजनाबरोबरच पीएमपी सक्षम करण्याचा विश्वास व्यक्त केला. ‘लोकसत्ता’चे सहायक संपादक मुकुंद संगोराम यांनी मुंढे यांचे स्वागत केले.

‘पीएमपीचे स्वत:चे कोटय़वधींचे अंदाजपत्रक आहे. निधीची कोणतीही कमतरता नाही. मात्र पीएमपीला गरज आहे ती स्वतंत्र कार्यप्रणालीची (वर्क कल्चर) आणि चांगल्या कामाच्या इच्छाशक्तीची. त्यामुळेच पीएमपीच्या कामकाजात मानवी हस्तक्षेप टाळण्याबरोबरच माहिती आणि तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्यात येईल,’ असे सूतोवाचही त्यांनी केले.

ते म्हणाले की, पीएमपीच्या सेवेला प्रवाशांकडून चांगली मागणी आहे. मात्र योग्य पद्धतीने ही सेवा दिली जात नाही. पीएमपीच्या कारभारामुळे काही प्रश्नही निर्माण झाले आहेत. ते निश्चितच सुटतील, पण त्यासाठी इच्छाशक्तीची आवश्यकता आहे. व्यवस्थापनाबरोबरच प्रवासी, राज्यकर्ते, लोकप्रतिनिधी यांचा पीएमपीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची आवश्यकता आहे. प्रशासकीय कामात मानवी हस्तक्षेप वाढला की गैरव्यवहार जास्त होण्याची शक्यता असते. त्यामुळे माहिती आणि तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर पीएमपीच्या कारभारात केला जाईल. नवी मुंबई येथे काम करत असताना तेथील परिवहन महामंडळ चालविण्याचा अनुभव माझ्या पाठीशी आहे. त्यामुळे प्रवासीकेंद्रित निर्णय मी निश्चितच घेऊ शकतो. हे निर्णय कटू असले तरी प्रवाशांसाठी हितकारकच असतील. त्या दृष्टीनेच आवश्यकतेप्रमाणे मार्गाची फेररचना करण्यात येईल.

बदली करण्याचा अधिकार हा सर्वस्वी शासनाचा आहे. त्यामुळे बदली होणार हे गृहीतच असते. प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना हा कामाचा एक भाग असतो. मात्र बदली होईल, या भीतीपोटी मी काम करणे थांबवत नाही. मी घेत असलेले निर्णय कायद्याच्या चौकटीत बसतात का, समाजावर त्याचा काय आणि कसा परिणाम होईल, नैतिकदृष्टय़ा निर्णय घेणे योग्य आहे का, याचा विचार करूनच मी निर्णय घेतो. माझ्या कामात कितीही अडथळे आले तरी ती त्यावर त्या परिस्थितीनुसार निर्णय घेत मात करतो.  लोकांसाठी काम करताना माझी स्वयंप्रेरणा (सेल्फ मोटिव्हेशन) महत्त्वाची ठरते. कायद्याच्या चौकटीत मी काम करतो आणि यापुढेही करत राहणार हे सांगताना एकाच ठिकाणी मी फार काळ राहात नाही, असे त्यांनी मिश्किलपणे सांगितले.

काम करणाऱ्यांच्या पाठिशी, कामचुकारांवर कारवाई

काम करणारे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या पाठिशी मी कायमच ठामपणे उभा राहीन. मात्र कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई होणारच. नियमानुसार माझे काम आठ तासांचे आहे. पण चोवीस तास उपलब्ध राहणे हे माझे कर्तव्य आहे. मीच व्यवस्थित काम केले नाही तर कर्मचारी कसे काम चांगले काम करतील, असा प्रश्न मुंढे यांनी उपस्थित केला.

मुंढे म्हणाले..

*  प्रशासकीय कामात आयटीची अधिकाधिक वापर व्हावा

* बस आणि मार्गाची माहिती देणारे अ‍ॅप्स लवकरच

*  प्रवासीकेंद्रित निर्णयांवर भर

*  पीएमपीच्या हितासाठी कटू निर्णयही घेणार

.. तर प्रवासीही आकर्षित

पीएमपीच्या माध्यमातून प्रवाशांना सेवा दिली जाते. त्या सेवेपोटी पैसे आकारले जातात. त्यामुळे प्रवाशांना योग्य सोयी-सुविधांबरोबरच चांगली सेवा मिळणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने योग्य प्रयत्न झाल्यास पीएमपीची विश्वासार्हता निश्चितच वाढेल आणि प्रवासीही पीएमपीकडे आकर्षित होतील, असेही मुंढे यांनी स्पष्ट केले.