पुण्यातील टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीचे रिपोर्टर पांडुरंग रायकर यांचे बुधवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास कोविड केअर रूग्णालयात करोनावर उपचार सुरू असताना निधन झाले. पण त्यापूर्वी रात्री पावणे दोन वाजण्याच्या सुमारास रायकर यांनी पुण्यातील एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर मेसेज पाठवत आपल्या भावना व्यक्त केल्या. या मेसेजचा स्क्रिनशॉट सध्या सोशल मीडियातून व्हायरल झाला आहे. या मेसेजमधून त्यांना अनेक वेदना होत असल्याचे कळते.

‘वाईट वाईट वाटते मला न्यय’ असा शेवटचा मेसेज पांडुरंग रायकर यांनी मंगळवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास पत्रकारांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर केला होता. त्यानंतर बुधवारी पहाटे पाच वाजता त्यांचे निधन झाले. या मेसेजच्या माध्यमातून रायकर यांना किती वेदना होत असतील याचा अंदाज येऊ शकतो. हा मेसेज शहरातील सर्व सोशल मीडियावर व्हायरल झाला असून प्रशासनाच्या कारभाराविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

करोना पुण्यात दाखल झाल्यापासून गेल्या काही महिन्यांत शहरातील रुग्णसंख्या सातत्याने वाढतच आहे. त्यामुळे तातडीची बाब म्हणून राज्य शासनाने शिवाजीनगर येथील सीईओपी महाविद्यालयाच्या मैदानावर कोट्यवधी रुपये खर्चून ८०० बेडचं जम्बो कोविड केअर सेंटर उभारलं. या सेंटरचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात झालं. यावेळी “कोणत्याही रुग्णााला आता जीव गमवावा लागणार नाही. त्यांच्यावर ठणठणीत उपचार होतील” असे मान्यवरांकडून बोलले गेले होते. या विधानाला आठ दिवस होत नाही तोवरच पुण्यात याच रुग्णालयात आज पत्रकार पांडुरंग रायकर यांचे निधन झाले.