शॉर्ट सर्किट, रॉकेल, पेट्रोल यांसह अन्य कारणांमुळे लागलेल्या आगीवर कशा प्रकारे नियंत्रण मिळवायचे आणि आगीत अडकलेल्यांची सुटका करून जीव वाचविण्यासाठी कसे मदतकार्य करायचे, याचे धडे विद्यार्थ्यांना अग्निशामक दल आणि विशेष सुरक्षा सेवेच्या अधिकाऱ्यांनी दिले. अग्निशामक दलाच्या गाडीसह विविध उपकरणे हाताळत विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिकांमध्ये उर्त्स्फतपणे सहभाग घेतला.

आम्ही पुणेकर आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ यांच्यातर्फे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, ढोल-ताशा पथकातील वादक, पोलीस मित्र आणि गणेशोत्सव कार्यकर्त्यांना आगीपासून संरक्षण देणारे प्रशिक्षण पुणे विद्यापीठाच्या मैदानावर झाले. कुलगुरू डॉ.नितीन करमळकर, उपकुलगुरू डॉ.एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. अरविंद शाळीग्राम, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ.प्रभाकर देसाई, विद्यावाणी रेडिओचे संचालक आनंद देशमुख, वाहतूक पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते, अग्निशमन दल अधिकारी राजेश जगताप, विजय माताळे, दीपाली पवार, महेश जगताप, श्रीदत्त गायकवाड, हेमंत जाधव, प्रणव पवार, अरविंद जडे, समीर देसाई या वेळी उपस्थित होते.

जगताप म्हणाले, आगीत अडकलेल्या व्यक्तीचा आगीपेक्षा धुराने जीव जातो. त्यामुळे त्याला बाहेर काढून प्रथमोपचार द्यायला हवे. सध्या अग्निशामक दलाची १२ केंद्रे असून प्रत्यक्षात किमान ३० केंद्रांची आवश्यकता आहे.