शंभर वर्षांनंतरही आजच्या सामाज-स्थितीला समांतर वाटणाऱ्या  निवडक अग्रलेखांच्या दमदार वाचनाद्वारे  लोकमान्य टिळकांच्या बहुपेडी व्यक्तिमत्त्वाचे मनोज्ञ दर्शन लोकसत्ताच्या ‘एकमेव लोकमान्य’ या विशेषांकाच्या प्रकाशनानिमित्ताने घडले.

लोकमान्य टिळक यांच्या स्मृतिशताब्दी वर्षांनिमित्त ‘एकमेव लोकमान्य’ या विशेषांकाचे प्रकाशन ज्येष्ठ अभिनेते गायक चंद्रकांत काळे, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त लेखक अभिनेते गिरीश कुलकर्णी, ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर, ज्येष्ठ रंगकर्मी  आणि नाटय़ निर्माते अजित भुरे, ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लि. चे सुशील जाधव, मे. बी. जी. चितळे डेअरीचे गिरीश चितळे, स्टोरीटेल अ‍ॅपचे प्रसाद इनामदार, द टिळक क्रोनिकलचे कुणाल टिळक, पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे गिरीश देसाई, लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या हस्ते झाले. या उपक्रमासाठी ग्रॅव्हिटस कॉर्प हेही सहप्रायोजक होते. लोकसत्ताचे सहायक संपादक मुकुंद संगोराम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. राज्यासह देश-विदेशातील वाचकांनी प्रचंड संख्येने या कार्यक्रमात सहभाग घेतला.

‘एकमेव लोकमान्य’ हा विशेषांक तयार करण्यामागील भूमिका लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी मांडली. ‘लोकमान्य टिळक यांची स्मृतिशताब्दी हा महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक क्षण आहे. त्यामुळे इतिहासाला उजाळा मिळावा, या विचाराने ‘एकमेव लोकमान्य’ हा विशेषांक तयार करण्याचे लोकसत्ताने ठरवले. लोकमान्य टिळकांनी त्यांच्या साठ वर्षांच्या आयुष्यात केलेले काम पाहून थक्क व्हायला होते. गणित, खगोल, भाषा, राजकारण, अर्थशास्त्र अशा अनेक विषयांना त्यांनी स्पर्श केला. लोकमान्य टिळक म्हणजे शेंगांची टरफले, सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय एवढय़ापुरतेच नाहीत हे समजून घ्यायला हवे. महाराष्ट्राची देदीप्यमान पुरोगामी परंपरा आणि बुद्धीचा वारसा गर्वाने सांगायला हवा,’ असे कुबेर म्हणाले.

निवडक अग्रलेखांच्या वाचनातून मराठी चित्रपट-नाटय़ क्षेत्रातील अनुभवी कलाकारांनी लोकमान्यांच्या लेखनशैलीचे, भाषा वैभवाचे, ठाम आणि सुस्पष्ट विचारांचे दर्शन रसिकांना घडवले. पाच सडेतोड अग्रलेख या कार्यक्रमात तितक्याच तालेवार पद्धतीने वाचण्यात आले. केंद्र शासनाकडून नव्या शैक्षणिक धोरणाला नुकतीच मान्यता मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर लोकमान्यांनी शिक्षणाबद्दल मर्मभेदी विचार मांडलेला ‘युनिव्हर्सिटय़ा ऊर्फ सरकारी हमालखाने’ हा अग्रलेख चंद्रकांत काळे यांनी वाचला. ‘युनिव्हर्सिटय़ा स्थापन होऊन पन्नास साठ वर्षे होऊन गेली तरी त्यातून विद्वान असे निपजलेच नाहीत,’ असे स्पष्ट मत मांडताना ‘एतद्देशीयांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी दिले जाणारे इंग्रजी शिक्षण एकांगी आहे’ असेही टिळकांनी ठणकावले आहे. तसेच ‘युनिव्हर्सिटीच्या शिक्षणात फेरफार होणे आवश्यक आहे, तरच विद्वान तयार होतील’ असेही त्यांनी या अग्रलेखात नमूद केले आहे. विशेष म्हणजे तब्बल ११८ वर्षांपूर्वी लिहिलेला हा अग्रलेख आजही तितकाच लागू पडतो.

‘आमच्या बुद्धीस खरोखरच उतरती कळा लागली काय?’ या अग्रलेखाचे वाचन अजित भुरे यांनी केले. शिक्षणावरच भाष्य करणाऱ्या या अग्रलेखातून टिळकांनी विद्यार्थ्यांवर दडपण येणार नाही असा अभ्यासक्रम असण्याची गरज व्यक्त केली आहे. तर विद्यार्थ्यांनीही सकस अन्न घेणे, शरीर आरोग्यदायी ठेवणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले आहे. औद्योगिक क्षेत्राचे महत्त्व आणि अर्थविचार मांडणाऱ्या ‘पुण्यातील चिमणी’ हा अग्रलेख गिरीश कुलकर्णी यांनी सादर केला. पुण्यासह भारतातील उद्योग, परदेशातील उद्योग यांचा सविस्तर आढावा घेत टिळकांनी औद्योगिक क्षेत्र बळकट होणे का गरजेचे आहे, याची मांडणी १८९३मध्ये केली होती. त्यात आजही फारसा फरक पडला आहे असे म्हणता येणार नाही.

महाराष्ट्राच्या बौद्धिक आणि सामाजिक जडणघडणीत टिळकांप्रमाणेच गोपाळ गणेश आगरकर यांचीही भूमिका महत्त्वाची होती. काही कारणाने टिळक आणि आगरकर यांच्यात वितुष्ट आले होते. मात्र, आगरकरांच्या निधनानंतर २१ वर्षांनी ‘आगरकर’ हा अग्रलेख टिळकांनी लिहिला होता. त्यात टिळकांनी आगरकरांचे मोठेपण दाखवून देत त्यांच्याविषयीचा आदरभाव प्रकट केला होता. त्याचवेळी एकांगी पद्धतीने चरित्र लिहिणाऱ्या लेखकांनाही ठणकावले. टिळकांना मित्राविषयी असलेल्या ममत्वाचे मनोज्ञ दर्शन या अग्रलेखातून घडते. या अग्रलेखाचे वाचन सचिन खेडेकर यांनी केले. तर १८९९मध्ये मंडालेच्या कारागृहातून परतल्यानंतर टिळकांनी लिहिलेल्या ‘पुनश्च हरिओम’ या अग्रलेखाचे वाचन प्रमोद पवार यांनी केले. टिळकांनी विविध विषयांवर विपुल लेखन केले असले, तरी पत्रकार आणि संपादक म्हणून त्यांनी तत्कालीन समाज, राजकारण, धोरणांविषयी केलेले लेखन आजही विचार करायला लावणारे आहे, याची अनुभूती या अग्रलेखांच्या वाचनातून रसिकांना आली.

* मुख्य प्रायोजक : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लि.

* सहप्रायोजक : ग्रॅव्हीटस कॉर्प. आणि मे. बी. जी. चितळे डेअरी

* पॉवर्ड बाय : दि. टिळक क्रोनिकल आणि पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट

* ऑडिओबुक पार्टनर : स्टोरीटेल अ‍ॅप