मराठा आरक्षणाला न्यायलायने स्थगिती दिल्यानंतर पुन्हा मराठा क्रांती मोर्चा, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, छावा संघटना या संघटनांनी आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर आज(मंगळवार) पिंपरी-चिंचवडचे स्थानिक शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, भाजपा आमदार लक्ष्मण जगताप, भाजपा आमदार आणि शहराध्यक्ष महेश लांडगे, राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या घरासमोर  मराठा सेवा संघ आणि इतर संघटनांनी संभळ वाजवून मराठा आरक्षणा विषयी लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार, खासदारांना निवेदनही देण्यात आले आहे.

मराठा आरक्षणाला न्यायलायने स्थगिती दिल्यानंतर हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून ,मराठा बांधव आंदोलनाच्या तयारीत आहेत. दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरातील स्थानिक आमदार आणि खासदार यांच्या घरासमोर मराठा क्रांती मोर्चा, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, छावा संघटना आदींनी संभळ वाजवून आंदोलन केले. आरक्षणाबाबत खासदारांनी संसदेत आवाज उठवावा अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समनव्यक मारुती भापकर म्हणाले की, मराठा समाजाच्या आरक्षणा संदर्भात भावना तीव्र आहेत, ५८ मोर्चे शांततेच्या मार्गाने काढले आहेत. मात्र आरक्षण मिळवून देण्यास राज्यसरकार अपयशी ठरल आहे. न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. हा निर्णय मराठा तरुणी-तरुणांसाठी धक्कादायक आहे. कारण, शिक्षणात आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळायला सुरुवात झाली होती. पण, या स्थगितीमुळे त्यांच्यात नैराश्य पसरले आहे. त्यामुळे आत्महत्या देखील होऊ शकतात. राज्यात महाविकासआघाडीचे सरकार आहे तर केंद्रात भाजपाचे सरकार आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून एक मागणी आहे की, ५० टक्के आरक्षणाची अट आहे. त्यासंदर्भात संसदेच्या अधिवेशनात कायदेशीर तरतूदींचा अभ्यास करून या आरक्षणाची अट स्थिर होईल, अशा पद्धतीची घटना दुरुस्ती करून आरक्षण मिळावं ही अपेक्षा आहे. आरक्षण न मिळाल्यास महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.