मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांनी राज्यात वाढत असणाऱ्या जातीयवादावर शुक्रवारी तीव्र खंत व्यक्त केली. पुण्यातील त्यांच्या घरी दीड दिवसांच्या गणपतीचे आगमन झाले. या मंगलप्रसंगी त्यांनी देशातील आणि राज्यातील जातीयवादाच्या भीषण परिस्थितीवर भाष्य केले. बाप्पाने मला खूप काही दिले. यंदाच्या वर्षी देशासह राज्यात एकोपा निर्माण व्हावा, एवढीच प्रार्थना मी बाप्पाच्या चरणी करेन, असे ते म्हणाले. जातीयवाद ठरवून केला जात असून, हा प्रकार देशासाठी घातक आहे. सध्याच्या घडीला आडनाव विचारून तू कुठल्या जातीचा मी कुठल्या जातीचा अशी विचारणा होते. पूर्वीचा महाराष्ट्र असा नव्हता. हा सर्व प्रकार नक्की कशासाठी केला जातोय, याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. तात्कालिक निवडणुकांसाठी जर हे होत असेल, तर पाच वर्षांच्या निवडणुकीसाठी तुम्ही महाराष्ट्राला २०० वर्षे मागे घेऊन जात आहात, असा टोला त्यांनी जातीयवादाचे राजकारण करणाऱ्या नेत्यांना लगावला. नालायक नेत्यांना आपण दूर ठेवत नाही, तोपर्यंत आपण एकत्र येऊ शकणार नाही, असेही ते म्हणाले.

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या मुद्द्यावरून पुणे महापालिका आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांच्यात सुरू असलेल्या वादावरही त्यांनी भाष्य केले. सार्वजनिक गणेशोत्सव भाऊसाहेब रंगारी यांनी सुरु केला असेल, पण सार्वजनिक गणेशोत्सवाचा प्रचार टिळकांनी केला हे आपण मान्य करणार आहोत का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.  आपण ग्राहक आहोत आणि ते दुकानदार आहेत, अशा शब्दांत त्यांनी जातीयवादाला बळ देणाऱ्यांचा समाचार घेतला. आपल्याला खरं किंवा खोट कळत नाही, तोपर्यंत हे थांबणार नाही. ज्यावेळी आपण ठरवू की या गोष्टींमुळे आम्हाला काही फरक पडणार नाही तोपर्यंत राजकीय नेत्यांची दुकानदारी सुरुच राहिल. त्यामुळे खरं आणि खोटं समजण्याची बुद्धी आम्हाला दे! हीच बाप्पाचरणी प्रार्थना करेन, असे ते म्हणाले. सुबोध भावे यांच्या पुण्यातील घरी दीड दिवसांचा गणपती बसवण्यात आला आहे. दीड दिवसांचा हा उत्सव वर्षभर ऊर्जा देतो, असे ते यावेळी म्हणाले.