News Flash

पुण्यात महापौर बदल; पण पिंपरीतील पेच कायम

सर्व शक्यता तपासूनच निर्णय घेण्याची सावध भूमिका ‘कारभारी’ अजित पवार यांनी घेतली असून योग्य वेळी महापौर बदलाचा निर्णय घेऊ...

पुण्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे यांना पक्षाने दिलेल्या आदेशाप्रमाणे त्यांनी पदाचा राजीनामा दिला असला, तरी तसाच निर्णय पुण्याशेजारच्या पिंपरीत मात्र राष्ट्रवादीला घेता आलेला नाही. पिंपरीच्या महापौर शकुंतला धराडे यांच्या कामगिरीबाबत मोठी नाराजी असतानाही सक्षम पर्यायाचा अभाव आणि बदलत्या राजकीय समीकरणांमुळे महापौर बदलताना सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसपुढे पेच निर्माण झाला आहे. आगामी पालिका निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर, सर्व शक्यता तपासूनच निर्णय घेण्याची सावध भूमिका ‘कारभारी’ अजित पवार यांनी घेतली असून योग्य वेळी महापौर बदलाचा निर्णय घेऊ, असे त्यांना जाहीर करावे लागले आहे.
पुणे आणि पिंपरीतील महापौर बदलाची चर्चा दोन महिने होती. त्यामुळे दोन्हीकडचे महापौरपदासाठीचे इच्छुक तयारीला लागले होते. पुण्यातील महापौरपद खुल्या वर्गासाठी असल्याने या पदासाठी अनेक नगरसेवक इच्छुक आहेत. मात्र महापौर बदल लवकर होत नव्हता. हा बदल झालाच तर तो पुणे आणि पिंपरीत अशा दोन्ही महापालिकांमध्ये होईल किंवा दोन्हीकडे होणार नाही, असे पक्षातून सांगितले जात होते. प्रत्यक्षात पुण्याच्या महापौरांनाच राजीनामा द्यायला सांगण्यात आले आणि त्यानुसार त्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे सहाजिकच पिंपरीचे काय अशी चर्चा सुरू झाली.
पुण्यात महापौरपदासाठी माजी उपमहापौर दिलीप बराटे, माजी सभागृहनेता सुभाष जगताप, नगरसेवक बाळासाहेब बोडके, विकास दांगट, प्रशांत जगताप, बाबूराव चांदेरे, चेतन तुपे अशा अनेक नावांची चर्चा आहे. अनेकजण इच्छुक असल्यामुळे पुण्यातही पक्षापुढे पेच आहे आणि सर्वच इच्छुकांची तयारी जोरात असल्याचे चित्र आहे.
पिंपरीत दोनच पर्याय
पिंपरीत महापौरपदासाठी अनुसूचित जमातींचे आरक्षण असून या संवर्गातील केवळ तीन नगरसेवक महापालिकेत आहेत. त्यापैकी महापौर शकुंतला धराडे यांनी १५ महिने महापौरपद भूषवले असून त्यांच्या राजीनाम्यासाठी पक्षात वाढता दबाव आहे. आशा सुपे आणि रामदास बोकड हे दोनच पर्याय आहेत. सुपे माजी आमदार विलास लांडे यांच्या समर्थक आहेत. महापौरपदाची संधी त्यांना द्यावी, अशी मागणी पक्षाच्या ३२ नगरसेवकांनी अजितदादांकडे केली आहे. तर, बोकड हे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे समर्थक आहेत. लांडे राष्ट्रवादी सोडण्याच्या मन:स्थितीत आहेत. तर, जगतापांनी राष्ट्रवादी सोडून भाजपशी संसार थाटला आहे. त्यामुळे महापौर बदलताना राष्ट्रवादीपुढे दोनच पर्याय आहेत.
विद्यमान महापौर धराडेदेखील जगताप समर्थक असून भविष्यात त्या राष्ट्रवादीत राहतील की भाजपमध्ये जातील, याविषयी राष्ट्रवादीतच साशंकता आहे. अशा अनिश्चित परिस्थितीत महापौर बदलाचा विषय राष्ट्रवादीपुढे आहे. महापौरांना मुदतवाढ देण्याचा विचार केला तर त्यांची कामगिरी सुमार आहे. नवा महापौर करायचा तर संभाव्य उमेदवारांना त्यांचे ‘राजकीय गुरू’ अडचणीचे ठरत आहेत. महापौरपदासाठी निवडणुकीला सामोरे जाण्याची वेळ आलीच, तर राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिक्षण मंडळात राष्ट्रवादी नेत्यांना सदस्यांच्याच तालावर नाचावे लागले, हा ताजा अनुभव आहे. काही वर्षांपूर्वी स्थायी समिती अध्यक्षपदाच्या गाजलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे बहुमत असतानाही तत्कालीन काँग्रेसच्या श्रीरंग बारणे यांनी सर्व पक्षांची मोट बांधून विजयश्री खेचून आणली होती. सध्याची राष्ट्रवादीतील गटबाजी, सुभेदारांची संदिग्ध भूमिका, पक्षनेतृत्वावरच नाराज असलेले नगरसेवक आदी मुद्दय़ांच्या पाश्र्वभूमीवर, निवडणुकांना सामोरे जात असताना सर्व शक्यता तपासून महापौर बदलाचा निर्णय घेण्याची भूमिका राष्ट्रवादीला घ्यावी लागणार आहे.

सर्व शक्यता तपासून पिंपरीच्या महापौर बदलाबाबतचा निर्णय योग्य वेळी घेऊ. – अजित पवार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 4, 2016 3:35 am

Web Title: mayor changes pimpri permanent embarrassment
टॅग : Changes,Mayor,Pimpri
Next Stories
1 अल्पवयीन मुलांकडून होणारे गुन्हे वाढल्यामुळे पुण्यात आणखी एक बालन्यायालय प्रस्तावित
2 शाळाबाहय़ मुलांच्या सर्वेक्षणात पुन्हा पहिले पाढे पंचावन्न
3 प्रगती एक्स्प्रेसच्या वातानुकूलित पासधारकांची रेल्वेकडून फसवणूक
Just Now!
X