कोट्यवधी भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सचिन तेंडुलकरने आज वयाच्या ४५ व्या वर्षात पदार्पण केलं आहे. देशभरातूनच नव्हे तर जगभरातून सचिनचा चाहतावर्ग त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आहे. आतापर्यंत तुम्ही सचिनने अनेक चाहते पाहिले असतील, अनेक चाहत्यांची सचिनवरच्या निस्सीम प्रेमामुळे आज एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. भारताच्या प्रत्येक सामन्यात सचिनचं नाव आपल्या शरिरावर रंगवून घेत उपस्थित असणारा सुधीरही अशाच चाहत्यांपैकी एक. मात्र पुण्याच्या कॅम्प परिसरात राहणाऱ्या एका अवलियाने सचिनची तब्बल २२ हजार कात्रण जमा केली आहेत. सचिनचं लहानपण, त्याचा रणजीतला प्रवास आणि निवृत्तीचा क्षण अशा प्रत्येक महत्वाच्या प्रसंगाच्या कात्रणांमधून पुण्याचे राजू गायकवाड दरवर्षी सचिनचा वाढदिवस साजरा करत असतात.

अवश्य वाचा – Happy Birthday Sachin: वो दुनिया हे मेरी…सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना विरेंद्र सेहवाग भावुक

सचिनच्या प्रत्येक वाढदिवसाला पुण्यातले अनेक क्रीडाप्रेमी गायकवाड यांचा संग्रह पहायला हजेरी लावत असतात. पुण्यातल्या कॅम्प परिसरात राहणारे गायकवाड हे बँकेत नोकरी करतात. मात्र नोकरी करता करता गायकवाड यांनी आपली ही आवड जोपासली आहे. सचिनच्या आयुष्याशी निगडीत तुम्ही कोणत्याही घटनेचा उल्लेख करा, त्या गोष्टीचं कात्रण गायकवाड यांच्याकडे हजर असतं. आजच्या खास दिवशी लोकसत्ता ऑनलाईने गायकवाड यांच्याशी संवाद साधत त्यांच्या आवडीबद्दल अधिक माहिती घेतली. ” मला लहानपणापासून क्रिकेटची आवड होती. महाविद्यालयात असताना मी चंदु बोर्डे, कपिल देव, सुनिल गावसकर यांच्यासारख्या खेळाडूंची कात्रण जमवायचो. मात्र याचवेळी सचिनने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्याच्या रणजीतल्या काही खेळींबद्दल पेपरमध्ये लिहून आलं होतं. यानंतर जेव्हा मी सचिनचा खेळ बघितला, त्या क्षणापासून मी त्याचा चाहता झालो.” यातून त्याच्या  प्रत्येक खेळीचं कात्रण एक आठवण म्हणून मी जमवायला लागलो. आतापर्यंत आपण २२ हजार कात्रण जमवल्याचंही गायकवाड मोठ्या अभिमानाने सांगतात.

दस्तुरखुद्द सचिनने २००१ आणि २००५ साली गायकवाड यांच्या संग्रहाला भेट देऊन, त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावेळी सचिनने केलेलं कौतुक आठवलं की आजही माझं मन भरुन येतं असं गायकवाड यांनी सांगितलं. यावेळी बोलताना, सचिनचा संग्रह जमा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. २२ हजार कात्रण आपल्या घरात ठेवणं आता अशक्य झालेलं आहे…त्यामुळे पुणे महानगपालिकेने आपल्याला एखादी जागा उपलब्ध करुन दिल्यास हा अमुल्य ठेवा जतन राहिलं असं गायकवाड म्हणाले. क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या खेळाडूंसाठी आणि अनेक चाहत्यांसाठी आपला हा संग्रह भविष्यकाळात कामी येईल असंही गायकवाड म्हणाले.

कात्रणं जमवण्याच्या कामात गायकवाड यांना त्यांच्या घरच्यांची मोलाची साथ मिळते. हा संग्रह जमा करत असताना आपल्या वडिलांची धडपण मी जवळून अनुभवली आहे. त्यामुळे त्यांच्या कष्टांच आज चीज झालेलं पाहताना एक मुलगी म्हणून मला खूप आनंद होत असल्याचं, गायकवाड  यांची मुलगी उत्कर्षाने सांगितलं. भविष्यकाळात आपल्या वडीलांना त्यांचा छंद जोपासण्यासाठी आपण मदत करणार असल्याचंही उत्कर्षाने स्पष्ट केलं.

Happy Birthday Sachin Tendulkar : मास्टर ब्लास्टरच्या घराबाहेर मध्यरात्रीपासूनच चाहत्यांची गर्दी, साजरा केला वाढदिवस