02 March 2021

News Flash

जंगली महाराज रस्त्याचे ‘अरुंदीकरण’

ही कामे करताना रस्त्याची रुंदी कमी होणार नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते.

रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होण्यास सुरुवात झाल्याचे चित्र दिसत आहे.

‘मॉडेल रोड’वर वाहतूक कोंडीला सुरुवात; पुनर्रचनेच्या नावाखाली रस्त्याची मोडतोड

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत औंध परिसरात प्रस्तावित करण्यात आलेल्या ‘मॉडेल रोड’ या संकल्पनेला विरोध झाल्यामुळे जंगली महाराज रस्त्यावर ही योजना राबविण्यास सुरुवात झाली आहे. त्यासाठी ‘अर्बन स्ट्रीट डिझाइन’ अंतर्गत रस्त्याची पुनर्रचना करण्यात येत असल्याचेही प्रशासनाकडून सांगितले जात आहे. मात्र पुनर्रचनेच्या नावाखाली महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या जंगली महाराज रस्त्याची मोडतोड सुरू झाली आहे. या कामात रस्त्याची रुंदीही पूर्वीपेक्षा कमी झाली असून त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होण्यास सुरुवात झाल्याचे चित्र दिसत आहे.

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत औंध-बाणेर-बालेवाडी या परिसराला विकास क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले होते. याअंतर्गत औंध परिसरात मॉडेल रोड ही संकल्पना राबविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. मात्र या संकल्पनेला स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून मोठय़ा प्रमाणात विरोध झाला. त्यामुळे ही संकल्पना मागे पडली. पण पुन्हा एकदा स्मार्ट सिटी अंतर्गत जंगली महाराज रस्त्यावर ही संकल्पना राबविण्याचा घाट स्मार्ट सिटी विभाग आणि महापालिकेच्या पथ विभागाने घातल्याचे स्पष्ट झाले आहे.

महापालिका निवडणुकीची धामधुम सुरू झाली असताना जंगली महाराज रस्त्याचे काम हाती घेण्यात आले. अर्बन गाइडलाइन्स डिझाइन अंतर्गत या रस्त्यासह अन्य काही रस्त्यांची पुनर्रचना करण्यात येणार असल्याचे त्या वेळी प्रशासनाकडून सांगण्यात आले. मॉर्डन कॅफे चौक ते डेक्कन चौकापर्यंतच्या गरवारे पुलापर्यंत टप्प्याटप्प्याने हे काम करण्यात येणार आहे .महापालिकेच्या पादचारी सुरक्षा धोरणानुसार प्रमुख रस्त्यांच्या बाजूला सुरक्षित आणि विना अडथळा पदपथ, विशेष व्यक्तींसाठी खास सुविधा, ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था अशा काही बाबी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. पर्जन्यजल पुनर्भरण यंत्रणाही (रेन वॉटर हार्वेस्टिंग) येथे विकसित करण्यात येणार आहे. सध्या ही कामे वेगात सुरू आहेत.

ही कामे करताना रस्त्याची रुंदी कमी होणार नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षातील परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. पदपथांसाठी आणि सुशोभीकरण तसेच सायकल ट्रॅकसाठी मोठय़ा प्रमाणावर जागा सोडण्यात आल्यामुळे रस्त्याची रुंदी कमी होऊन पीएमपीचे बसथांबे पुढे सरकले असल्याचे चित्र आहे. जंगली महाराज रस्ता हा शहरातील एक प्रमुख आणि रहदारीचा रस्ता आहे. शिवाजीनगर, पुणे स्टेशन, महापालिका भवनापासून डेक्कन, कोथरूड, कर्वेनगरबरोबरच स्वारगेट परिसरातही काही बस रोज धावत असतात. सध्या बसथांबे पुढे आल्यामुळे बस थांबल्यानंतर येथे मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडीही होत आहे. मॉडेल रोड विकसित करण्याच्या नावाखाली सुस्थितीत असलेल्या या रस्त्याची मोडतोड करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनचालकांबरोबरच स्थानिक व्यापाऱ्यांमध्येही तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पदपथांवरही भविष्यात फेरीवाले आणि छोटय़ा व्यावसायिकांचे अतिक्रमण होण्याबरोबरच पार्किंगची समस्याही निर्माण होण्याची शक्यता असून सायकल ट्रॅकची या रस्त्याला आवश्यकता होती का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

युवा सेनेकडून तीव्र विरोध

रस्ता कमी करून पदपथ वाढविण्याच्या कामाला युवा सेनेकडून तीव्र विरोध करण्यात आला आहे. शहरातील पार्किंगची समस्या वाढत असताना विकासाच्या नावाखाली जंगली महाराज रस्ता कमी करण्याचा आणि विनाकारण वाहतुकीची कोंडी करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरू झाला आहे. विकासाच्या नावाखाली जनतेला वेठीस धरण्याचा प्रकार यातून होत असून पादचारी सुरक्षा आणि सुविधेच्या नावाखाली सुरू असलेला हे काम तात्काळ थांबविण्यात यावे, अशी मागणी युवा सेनेचे शिवाजीनगर विभाग अधिकारी अनिकेत कपोते यांच्यासह प्रवीण डोंगरे, अभिजित क्षीरसागर, हेमंत डाबी, टिंकू दास, रोहित जुनवणे, अशोक काकडे, किरण पाटील आणि सागर दळवी यांनी केली आहे. यासंदर्भात पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल, असेही कळवण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2017 2:13 am

Web Title: model road scheme started to implement on jangali maharaj road
Next Stories
1 ब्रॅण्ड पुणे : बागकामवेडय़ांच्या कौतुकाचे
2  ‘काही वैचारिक ऐकावे अशी शहरी लोकांची मानसिकता नाही’
3 ‘एटीएम’मध्ये पुन्हा खडखडाट;रक्कम काढण्यावरही अघोषित मर्यादा
Just Now!
X