भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी, करोना विषाणूमुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेल्या कुटुंबांसाठी धावून आला आहे. जगभरासह भारत देशात करोना विषाणूने थैमान घातलं आहे. परिस्थितीशी सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवस संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांच्या भल्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं सरकारतर्फे वारंवार स्पष्ट करण्यात येत आहे. मात्र या निर्णयाचा रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबांना चांगलाच फटका बसला आहे. अनेक छोटे व्यापारी, दुकानदार यांचंही यामध्ये नुकसान झालं आहे. पुण्यातील अशा गरजू लोकांसाठी काम करणाऱ्या मुकुल माधव फाऊंडेशनला धोनीने क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून १ लाख रुपयांची मदत केली आहे.

अवश्य वाचा – करोनाविरुद्ध लढ्यात पी.व्ही.सिंधू उतरली; मुख्यमंत्री सहायता निधीला ५ लाखांची मदत

इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रालाही करोनाचा फटका बसला आहे. पुण्यातही करोनाचे अनेक रुग्ण सापडले आहेत. एका संकेतस्थळाच्या माध्यमातून धोनीने ही मदत केली असून या रकमेतून पुण्यात रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबांसाठी साबण, डाळी, गहु-तांदूळ, पोहे, चहा, बिस्कीट, तेल, मसाले असे जिन्नस दिले जाणार आहेत. महेंद्रसिंह धोनीची पत्नी साक्षीने आपल्या इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत, अनेक लोकांना गरजेच्या वेळी पुढे येण्याचं आवाहन केलं आहे.

महेंद्रसिंह धोनीचा अपवाद वगळता, सौरव गांगुली, पी.व्ही.सिंधू, इरफान-युसूफ पठाण, बजरंग पुनिया, गौतम गंभीर या भारतीय खेळाडूंनीही करोनाविरोधातील लढ्यात आपलं योगदान दिलं आहे. राज्यात मुंबई, पुणे यांच्यासह महत्वाच्या शहरात करोनाचे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे आगामी दिवसांमध्ये सरकारी यंत्रणा या विषाणूवर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी होतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.