करोनाशी लढा अजूनही सुरूच असताना आता करोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस नावाचा आजार आढळून येऊ लागला आहे. काळी बुरशी म्हणून हा आजार ओळखला जात असून यावरील उपचार देखील महागडे असल्यामुळे त्यासंदर्भात रुग्णांमध्ये भितीचं आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर म्युकरमायकोसिसवरील उपचारांसंदर्भात पुणे महानगर पालिकेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. पुण्यात आढळणाऱ्या म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचारांसाठी महानगर पालिकेकडून अर्थसहाय्य देण्यात येणार असल्याचं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी जाहीर केलं आहे.

रुग्णांसाठी १५ बेड राखीव

राज्यभरात करोना आजारावरील रुग्ण संख्या आटोक्यात येत असतानाच आता म्युकरमायकोसिस आजाराचे रुग्ण आढळत आहेत. हे चिंतेची बाब ठरली असून पुणे शहरात म्युकरमायकोसिस आजाराचे रुग्ण आढळल्यावर त्यांच्यावर उपचार करण्यासाठी पुणे महापालिकेच्या शहरी गरीब योजनेअंतर्गत ३ लाख रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाणार आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. तसेच या रुग्णांसाठी महापालिकेच्या दळवी रुग्णालयात १५ बेड राखीव ठेवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

अर्थसहाय्य ३ लाख रुपयांपर्यंत वाढवले

यावेळी मुरलीधर मोहोळ म्हणाले की, पुणे महानगरपालिकेच्या शहर गरीब योजनेअंतर्गत महापालिका आणि खासगी रुग्णालयामध्ये आजारावर १ लाख रुपयांचे अर्थसहाय्य विविध आजारावर दिले गेले आहे. या योजनेचा हजारो नागरिकांनी लाभ घेतला असून आता विशेष करून म्युकरमायकोसिस आजाराचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे. तसेच, १ लाखांच्या ऐवजी ३ लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

म. फुले योजनेअंतर्गत  सुमारे १०० रुग्णालयांत म्युकरमायकोसिसवरील उपचार शक्य

महापौर पुढे म्हणाले की, पुणे महानगरपालिकेच्या शिवाजीनगर येथील दळवी रुग्णालयात १५ बेड राखीव ठेवण्यात आले आहे. तसेच तज्ञ डॉक्टरांची देखील नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे म्युकरमायकोसिस आजाराची कोणतीही लक्षणे आढळल्यास आपल्या जवळील रुग्णालयात जाऊन तातडीने तपासणी करून घ्यावी आणि त्यावर उपचार घ्यावेत, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी केले.

म्युकरमायकोसिस म्हणजे काय?

‘म्युकरमायकोसिस’ हा बुरशीजन्य आजार आहे. या बुरशीचा हवेतून संसर्ग होते. रोगप्रतिकारकशक्ती चांगली असलेल्यांना यापासून धोका नाही; परंतु रोगप्रतिकारकशक्ती कमी झालेल्या रुग्णांना तीव्र धोका असतो. नाकावाटे ही बुरशी शरीरात प्रवेश करते. तेथून ती सायनसमध्ये वाढते. कर्करोगाच्या पेशींपेक्षाही जलद गतीने वाढणारी ही बुरशी डोळ्यांतील पेशी, मेंदूतही प्रवेशही करते. त्यामुळे इतर बुरशीजन्य आजारांपेक्षाही हा संसर्ग अधिक धोकादायक असून याची बाधा झालेल्यांमध्ये जवळपास ३० टक्के मृत्युदर आहे.

 ‘एमआरआयद्वारे योग्य निदान

ही बुरशी शरीरात नाकातून डोळे, मेंदू अशी पसरली जाते. त्याचे निदान सिटीस्कॅन किंवा इतर चाचणीमध्ये होत नाही. ते एमआरआयमध्येच योग्यरितीने होते. प्रत्येक रुग्णाचे एमआरआय करणे गरजेचे आहे. एमआरआय करण्यासाठी साधारण एक तास लागतो आणि ही चाचणी महागही आहे. सध्या चाचण्या केंद्रांवर सिटीस्कॅनसाठीच एवढी गर्दी असते की एमआरआयसाठी वेळ देण्यास केंद्र तयार होत नाहीत. त्यामुळे पुढील काळात परिस्थिती आणखी आव्हानात्मक असेल, असे मत कान-नाक- घसातज्ज्ञ डॉ. अशेष भूमकर यांनी व्यक्त केले.

म्युकरमायकोसिस लक्षणे

नाकातून काळसर द्रव बाहेर पडणे, नाक सतत वाहत राहणे, डोळ्यांमधून पाणी येणे, डोळ्यांना सूज येणे, डोळे लाल होणे, नजर कमी होणे, अकारण दात हलणे, दात दुखणे