आगामी महापालिका निवडणूक चार सदस्यांचा एक प्रभाग या पद्धतीनुसार होणार असल्याचे स्पष्ट झाले असून या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची बैठक पक्षाचे नेते अजित पवार यांनी सोमवारी (६ जून) बोलाविली आहे. त्यात नगरसेवकांची झाडाझडती होईल अशी चर्चा आहे. महापालिकेच्या कारभाराचा आढावा, पक्षाचा वर्धापनदिन, तसेच इतर कार्यक्रम आणि मेळावे याबाबत बैठकीत चर्चा होईल.
घोले रस्त्यावरील महात्मा फुले संग्रहालय परिसरात असलेल्या पंडित नेहरु ऑर्ट गॅलरी येथे ही बठक होणार आहे. बठकीला राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी आणि नगरसेवकांना बोलावण्यात आले आहे. आगामी महापालिका निवडणूक चार सदस्यांच्या प्रभाग पद्धतीनुसार होणार आहे. त्यामुळे अजित पवार या संबंधीची चर्चा या बैठकीत नगरसेवकांबरोबर करणार आहेत. त्या बरोबरच महापालिकेतील कारभाराचा आढावा घेतला जाणार आहे. त्यात प्रलंबित असलेल्या प्रकल्पांवरही चर्चा होईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापनदिन १० जून (शुक्रवार) रोजी आहे. त्या निमित्ताने विविध कार्यक्रम आणि मेळावे आयोजित करण्यात येणार आहे. त्याबाबतही या बठकीत चर्चा होणार आहे.
पुणे जिल्हयातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचीही बठकही सोमवारी होणार आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या दृष्टिकोनातून या बठकीत चर्चा होणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 4, 2016 3:28 am