पक्षाचा उद्या वर्धापनदिन

पिंपरी महापालिकेत सलग दोनदा निर्विवाद बहुमत मिळवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला आगामी निवडणुकीत सत्तेची हॅटट्रिक साधायची आहे. त्या दृष्टीने ‘टीम अजितदादा’ कामाला लागली आहे. तथापि, ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्ष मात्र फुटीच्या उंबरठय़ावर आहे. पक्षात गळती सुरू असून नगरसेवकांचा मोठा गट मोक्याच्या क्षणी बाहेर पडण्याच्या तयारीत आहे. याशिवाय, ज्या नेत्यांच्या जीवावर सत्ता आणण्याचे राष्ट्रवादीचे नियोजन आहे, त्याच नेत्यांची भूमिका गुलदस्त्यात असल्याने पक्षपातळीवरही संभ्रमावस्था आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत महापालिका ताब्यात राखण्याचे कडवे आव्हान अजित पवारांपुढे आहे.

बारामतीच्या खालोखाल िपपरीत राष्ट्रवादीची ताकद आहे. शहरात विलास लांडे, महेश लांडगे, आझम पानसरे, अण्णा बनसोडे, संजोग वाघेरे, योगेश बहल, मंगला कदम अशा स्थानिक नेत्यांची फौज हीच राष्ट्रवादीची पर्यायाने अजित पवारांची एकत्रित ताकद आहे. यापैकीच एक असलेले लक्ष्मण जगताप विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेले. मात्र, त्यांचे समर्थक अजूनही राष्ट्रवादीत आहेत. टप्प्याटप्प्याने ते भाजपमध्ये जात आहेत. विद्यमान नगरसेवकांचा मोठा गट भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. मात्र, पक्षांतरबंदी कायद्यातून पळवाट काढण्यासाठी आणखी काही दिवस त्यांना राष्ट्रवादीशी काडीमोड घेता येणार नाही. त्याचपद्धतीने, विलास लांडे अथवा महेश लांडगे यांच्यापैकी जो कोणी राष्ट्रवादीशी फारकत घेतील, त्याचे समर्थकही तोच कित्ता गिरवणार आहेत. लांडे यांचे ‘तळ्यात-मळ्यात’ सुरू असल्याने ते राष्ट्रवादीत राहतील की दुसऱ्या कोणाशी ‘घरोबा’ करतील, याचा नेमका अंदाज त्यांच्या समर्थकांनाही नाही. अपक्ष आमदार महेश लांडगे लाल दिव्यासाठी राष्ट्रवादीतून भाजपच्या वाटेवर असल्याचे सांगण्यात येते. त्यांचे समर्थक त्यांचीच री ओढणार आहेत. त्यामुळे लांडगे कोणत्या पक्षाची निवड करणार, याविषयी तर्कवितर्क आहेत. आझम पानसरे यांना विधान परिषदेच्या आमदारकीचे वेध लागले आहेत. त्यांच्या मागून आलेले अनेक जण आमदार-खासदार झाले. मात्र, पानसरे तेथेच राहिले आहेत, याचे शल्य पानसरे यांना आहे, तसेच त्यांच्या समर्थकांनाही आहे. विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यापासून अण्णा बनसोडे राष्ट्रवादीपासून तसेच राजकीय मुख्य प्रवाहापासून दूर आहेत. त्यांची राजकीय भूमिका अनिश्चित मानली जाते. शहराध्यक्ष संजोग वाघेरे पक्षात एकाकी पडले असून शक्य तितक्या सहकाऱ्यांच्या मदतीने पक्षाचा गाडा ओढण्याचे काम ते करत आहेत. नगरसेवक तसेच महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांचा पक्षाशी संबंधच नाही, अशाप्रकारे संघटनात्मक दरी दिसून येते. पक्षनेत्या मंगला कदम आणि माजी महापौर योगेश बहल यांच्याकडे अजितदादांनी पालिकेचा कारभार दिला. मात्र, त्यांच्या एककल्ली कारभाराला पक्षातील नगरसेवक व कार्यकर्तेच वैतागले आहेत. याच मुद्दय़ावरून विरोधकांनी रान पेटवले आहे. ज्येष्ठ माजी महापौर आर.एस. कुमार राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून येतात आणि राष्ट्रवादीच्या विरोधात त्यांची भूमिका असते, अशी राष्ट्रवादीत सुरू असलेल्या घडामोडींची मोठी यादी देता येईल. अजितदादांची कार्यकर्त्यांमधील ‘क्रेझ’ कायम असून त्यांच्या नावानेच राष्ट्रवादीला महापालिका निवडणुकांना सामोरे जावे लागणार आहे. पक्षातील संभ्रमावस्था व काहीसे गढूळ वातावरण यामुळे कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत.

‘फूट नव्हे एकजूट; सत्तेची हॅटट्रिक राष्ट्रवादीचीच’

राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत असून निष्ठावंतांची एकजूट आहे. त्यामुळे पक्षात िखडार पडणार नाही. आमदार लक्ष्मण जगताप यांचे समर्थक आहेत, तेच पक्ष सोडून जातील, त्यांना थोपवता येणार नाही. इतर कोणी पक्ष सोडेल, असे वाटत नाही. विरोधक तसा अपप्रचार करत आहेत, असा निर्वाळा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिला. पक्ष सोडू शकतील, अशा नगरसेवकांशी वैयक्तिक चर्चा केली असता, आपण पक्षासोबत राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. राष्ट्रवादीने अजित पवार यांच्या माध्यमातून शहराचा कायापालट केला असून याच विकासाच्या मुद्दय़ावर आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी सत्तेची ‘हॅटट्रिक’ साधणार आहे, असा विश्वासही वाघेरे यांनी व्यक्त केला.