आपल्या देशामध्ये कायदे आहेत, पण या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणीच होत नाही. किमान वेतन कायदा आहे. पण, किमान वेतन मिळते का, हा खरा प्रश्न आहे. वाढती महागाई आणि रुपयाचे अवमूल्यन होत असताना जाणवणारा प्रभाव अशा स्थितीत जगायचं की मरायचं ही कामगारांपुढची समस्या आहे, असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी रविवारी केले.
रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडतर्फे आयोजित कामगार मेळाव्यात रामदास आठवले बोलत होते. पक्षाचे प्रवक्ते अर्जुन डांगळे, कोशाध्यक्ष एम. डी. शेवाळे, उपाध्यक्ष तानसेन ननावरे, शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, परशुराम वाडेकर, नवनाथ कांबळे, नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे, सुनंदा देवकर, चंद्रकांता सोनकांबळे, बाळासाहेब जानराव, हनुमंत साठे, एल. के. मडावी, श्रमिक ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष महेश शिंदे, शहराध्यक्ष संजय आल्हाट या प्रसंगी उपस्थित होते. आठवले यांच्या हस्ते भामाबाई क्षीरसागर, बाळासाहेब बहुले, वसंतराव बनसोडे आणि दत्तात्रेय पुणेकर यांना ‘श्रमिक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
कामगारांच्या कामाची वेळ पूर्वी दहा तास होती. केंद्र सरकारमध्ये कामगारमंत्री असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ती वेळ आठ तास केली. आता जागतिकीकरणामुळे बदललेल्या परिस्थितीत वाढती बेरोजगारी ध्यानात घेऊन कामाचे तास सहा करून तीनऐवजी चार पाळ्या करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे अधिकाधिक कामगारांना सामावून घेणे शक्य होईल, असे सांगून आठवले म्हणाले,‘‘असंघटित कामगारांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी श्रमिक ब्रिगेडने आंदोलने करावीत. राज्यामध्ये कारखाने आले पाहिजेत ही पक्षाची भूमिका आहे. पण, कामगारांचे शोषण होणार असेल आणि नफ्यातील वाटा मिळणार नसेल तर, मालकांविरुद्ध आवाज उठवावा. संघटित कामगारांची महागाई निर्देशांकानुसार पगारवाढ होते. पण, असंघटित कामगारांनी करायचे काय हा प्रश्नही हाताळला पाहिजे.’’
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे नोकरी करणाऱ्या महिलांना बाळंतपणाची रजा मिळाली आहे. कामगारांना त्यांच्या कामाचे, रक्ताचे, घामाचे मोल मिळाले पाहिजे यासाठी संघटनेने आवाज उठवावा, अशी अपेक्षा अर्जुन डांगळे यांनी व्यक्त केली.