शहरात लक्ष्मी रस्त्यावर बेलबाग चौक ते टिळक चौक (अलका टॉकीजजवळ) दरम्यान आठवडय़ातून एक दिवस नो व्हेइकल झोन ही योजना प्रायोगिक तत्त्वावर राबवण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार केला असून हा प्रस्ताव शहर सुधारणा समितीपुढे मंजुरीसाठी आला आहे.
शहरातील वाढती संख्या लक्षात घेऊन नो व्हेइकल झोन ही योजना प्रायोगिक तत्त्वावर राबवण्याची योजना पुणे महापालिका हद्दीत प्रथमच राबवण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. लक्ष्मी रस्त्यावरील वाहतुकीला केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता हे पर्यायी रस्ते असून या रस्त्यांवरून पर्याय देता येऊ शकेल. तसेच लक्ष्मी रस्त्याच्या परिसरात पार्किंगच्याही सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे नो व्हेइकल झोन आठवडय़ातून एकदा राबवणे शक्य होईल, असे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. या रस्त्यावर ही योजना यशस्वी झाली, तर विविध क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील रस्त्यावर ही योजना त्या त्या विभागातील पदाधिकारी व प्रशासकीय यंत्रणेमार्फत राबवता येईल, असेही प्रशासनाच्या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.
ही योजना राबवताना लोकप्रतिनिधी, स्थानिक व्यावसायिक, दुकानदार, स्वयंसेवी संस्था तसेच वाहतूक पोलिस यांच्याशी चर्चा करून रस्ता व आठवडय़ातील वार निवडण्याचे सर्वाधिकार आयुक्तांना द्यावेत, असेही या प्रस्तावात म्हटले आहे. या योजनेत अधिकाधिक लोकांनी सहभागी होण्यासाठी नो व्हेइकल झोनच्या दिवशी त्या रस्त्यावर वेगवेगळे नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचीही कल्पना आहे.
प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबवण्याचा ठराव एप्रिल महिन्यात स्थायी समितीने मंजूर केला होता. त्यानंतर पीएमपी, सर्व क्षेत्रीय कार्यालये तसेच वाहतूक पोलिसांकडून त्याबाबत अभिप्राय मागवण्यात आले होते. त्यानुसार पीएमपीने या योजनेबाबत पत्र दिले आहे, तर हा प्रस्ताव महापालिकेने सुचवलेला असल्यामुळे त्याची कार्यवाही महापालिकेकडूनच होणे उचित होईल, असे कळवले आहे. या योजनेबाबत क्षेत्रीय कार्यालयांनी अभिप्राय दिलेले नाहीत.