News Flash

पीएमपीच्या सुटे भाग खरेदीतील गैरव्यवहारावर शिक्कामोर्तब

सुटय़ा भागांअभावी पीएमपीच्या अनेक गाडय़ा रस्त्यावर सातत्याने नादुरुस्त होत असल्याचे प्रकार घडत होते.

(संग्रहित छायाचित्र)

पीएमपीच्या सुट्टे भाग (स्पेअर पार्ट्स) खरेदीत गेल्या चार वर्षांत मोठा गैरव्यवहार झाल्याचे पीएमपी प्रशासनाने केलेल्या लेखापरीक्षणातून शिक्कामोर्तब झाले आहे. त्याबाबतचा प्राथमिक अहवाल पीएमपी प्रशासनाकडून सादर करण्यात आला असून ज्या दोन अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात हा प्रकार घडला त्याबाबतची खातेअंतर्गत चौकशी करण्यात येणार आहे. लेखापरीक्षणातूनच गैरव्यवहार झाल्याचे पुढे आल्यामुळे स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या आरोपांनाही पुष्टी मिळाली आहे.

सुटय़ा भागांअभावी पीएमपीच्या अनेक गाडय़ा रस्त्यावर सातत्याने नादुरुस्त होत असल्याचे प्रकार घडत होते. त्यामुळे पीएमपीचे तत्कालीन प्रभारी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्रीकर परदेशी यांनी सुट्टे भाग खरेदीसाठी दैनंदिन उत्पन्नातील काही भाग नियमितपणे राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला होता. पीएमपीला दररोज सव्वा ते दीड कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते.

या दैनंदिन उत्पन्नापैकी सहा टक्के निधी या प्रमाणे प्रतिदिन १२ ते १४ लाख रुपये गाडय़ांच्या देखभाल दुरुस्तीसाठी आणि सुटय़ा भागांच्या खरेदीसाठी ठेवण्यात येत होता. मात्र त्यानंतरही गाडय़ा नादुरुस्त होण्याचे आणि त्या रस्त्यावरच बंद पडण्याचे प्रकार सातत्याने होत होते, तर सुटय़ा भागांची खरेदी सातत्याने होत असल्याचा दावा पीएमपी प्रशासनाकडून करण्यात येत होता.

पीएमपीच्या भांडार विभागाकडून होत असलेल्या या खरेदीवर शहरातील स्वयंसेवी संस्था आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी काही आक्षेप नोंदविले होते. खरेदीमध्ये लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे आरोपही करण्यात आले होते.

सुटय़ा भागांच्या खरेदीमध्ये ताळमेळ बसत नसल्याचे लक्षात आल्यावर २०१५ ते २०१९ या चार वर्षांतील सुटे भाग खरेदीच्या प्रकरणांचे लेखापरीक्षण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्याचा अहवाल तयार झाला असून त्यामध्ये गैरव्यवहार झाल्याचे अधोरेखित झाले आहे.

पीएमपीच्या प्राथमिक अहवालात दोघा अधिकाऱ्यांकडे संशयाची सुई असून त्यांची खातेनिहाय चौकशी होणार असल्याचे पीएमपीकडून सांगण्यात आले. दोघा अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात खरेदीमध्ये अनियमितता झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रारंभी त्यांची चौकशी करून लेखी म्हणणे त्यांच्याकडून घेतले जाईल. त्यानंतर कारवाईबाबतचा निर्णय होईल, असे पीएमपीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

प्रवाशांना त्रास

बसगाडय़ांच्या सुटय़ा भागांअभावी पीएमपीच्या गाडय़ा बंद पडण्याचे प्रकार वाढले आहेत. प्रतिदिन १७५ गाडय़ा रस्त्यावर बंद पडत असल्याची आकडेवारी पीएमपी प्रशासनाकडून माहिती अधिकारात देण्यात आली आहे. गाडय़ा रस्त्यातच नादुरुस्त होत असल्यामुळे पुणे आणि िपपरी-चिंचवडमधील लाखो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2019 1:05 am

Web Title: non transactional buying of pmp parts
Next Stories
1 पिंपरीत मेट्रोच्या पाच स्थानकांचे काम बंद
2 पुण्यात जलवाहिनी फुटली, मुलीच्या लग्नाचे दागिने गेले वाहून
3 शिक्षण समिती कागदावरच
Just Now!
X