राज्यात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे, तसा करोना रुग्णांसाठी वापरल्या जाणाऱ्या अनेक महत्त्वाच्या औषधांचा तुटवडा जाणवत आहे. करोना रुग्णांवर उपचारांमध्ये प्रामुख्याने दिल्या जाणाऱ्या टोसिलिझुमॅब या इंजेक्शनचा तुटवडाही मागील काही दिवसांपासून आहे, मात्र रेमडेसिविर उपलब्ध होत नसल्यामुळे सध्या त्याचा तुटवडा प्रामुख्याने अधोरेखित होत आहे. अन्न आणि औषध प्रशासनही याला दुजोरा देत आहे.

राज्यातील वाढत्या करोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर प्राणवायू, औषधे, रुग्णालयातील खाटा, कृत्रिम श्वासोच्छवास यंत्रणा अशा अनेक गोष्टींचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रुग्णांच्या कु टुंबातील सदस्यांचे अतोनात हालही होत आहेत. करोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर प्रायोगिक तत्त्वावर वापरल्या जाणाऱ्या रेमडेसिविर या इंजेक्शनच्या तुटवड्याने राज्यात सर्वत्र हाहाकार माजवला आहे. त्याचवेळी गंभीर रुग्णांना दिल्या जाणाऱ्या टोसिलिझुमॅब इंजेक्शनचाही पुरेसा साठा नसल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.

डॉ. शीतल श्रीगिरी म्हणाल्या,की  हे सांधेदुखीवर वापरले जाणारे औषध आहे. करोनामुळे गंभीर असलेल्या रुग्णांमध्ये सध्या टोसिलिझुमॅब इंजेक्शनचा वापर के ला जातो. गेल्या काही दिवसांमध्ये करोना रुग्णवाढीमुळे त्याची मागणी प्रचंड वाढली आहे. अनेक दिवस हे इंजेक्शन उपलब्ध नाही. त्यामुळे करोनाच्या सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर वापरले जाणारे रेमडेसिविर आणि गंभीर रुग्णांवर वापरले जाणारे टोसिलिझुमॅब अशी दोन्ही महत्त्वाची औषधे बाजारातून गायब आहेत.