News Flash

भंगारातील ‘सीएनजी किट’  बसविलेले ‘धावते बॉम्ब’ रस्त्यावर!

नव्याने येणाऱ्या वाहनांमध्ये आता सीएनजी किटचा पर्याय वाहन उत्पादकांनीच दिलेला आहे.

विद्यार्थी वाहतुकीतील वाहनांसाठी प्रामुख्याने वापर

पेट्रोल, डिझेलपेक्षा सीएनजी इंधन परवडणारे असल्याने अनेकांकडून वाहने सीएनजीवर परिवर्तित करण्यात येत असतानाच भंगारात निघालेले सीएनजी किट कमी किमतीत बसवून देण्याचा धोकादायक प्रकार सध्या सुरू आहे. या प्रकारात काही टोळ्याच कार्यरत असल्याची माहिती वाहन दुरुस्ती व देखभाल क्षेत्रातील मंडळींनी दिली. अशा प्रकारातून सीएनजी किट बसविलेली वाहने कधीही धोका पोहोचवू शकणाऱ्या बॉम्बप्रमाणे रस्त्यावर धावत आहेत. गंभीर बाब म्हणजे विद्यार्थी वाहतुकीतील वाहनांचा त्यात प्रामुख्याने समावेश आहे.

वाहनांची वाढती संख्या व त्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा गंभीर प्रश्न लक्षात घेता सार्वजनिक वाहतुकीतील वाहने सीएनजी इंधनावर चालविण्याबाबत सर्वोच्च न्यायालयानेच निर्देश दिले आहेत. त्यानुसार बहुतांशी प्रवासी बस व शहरातील शंभर टक्के रिक्षा सीएनजी इंधनावर परिवर्तित झाल्या आहेत. सुरुवातीला सीएनजीचा शहरात मोठय़ा प्रमाणात तुटवडा होता. मात्र, पंपांची संख्या वाढविण्यात येत असल्याने सीएनजी तुटवडा कमी झाला आहे. सीएनजी परवडत असल्याने व्हॅन व इतर छोटी वाहनेही मोठय़ा प्रमाणावर सीएनजीवर परिवर्तित करण्यात येत आहेत. प्रदूषण कमी होण्याच्या दृष्टीने ही बाब स्वागतार्ह असली, तरी सीएनजी किट बसविण्याच्या प्रक्रियेमध्ये काही असामाजिक मंडळींचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे उपयुक्त सीएनजी धोकादायक होत आहे.

नव्याने येणाऱ्या वाहनांमध्ये आता सीएनजी किटचा पर्याय वाहन उत्पादकांनीच दिलेला आहे. पेट्रोल किंवा डिझेलवरील वाहन सीएनजीवर परिवर्तित करण्यासाठी सीएनजी किटसाठी वेगवेगळ्या कंपन्यांच्या किमतीर व वाहनांनुसार सुमारे २० ते ३० हजार रुपयांचा खर्च अपेक्षित असतो. किट उत्पादक कंपन्या व वाहनांत प्रत्यक्षात किट बसवून देणाऱ्या अधिकृत यंत्रणाही ठरलेल्या आहेत. किट बसल्यानंतर त्याला ‘आरटीओ’कडून मान्यताही घ्यावी लागते. मात्र, ही सर्व प्रक्रिया टाळून भंगारात निघालेल्या सीएनजी किटची तकलादू डागडुजी करून ती पाच ते दहा हजारांत बसवून देणाऱ्या टोळ्या सध्या पुणे व िपपरी-चिंचवड शहरात कार्यरत झाल्या आहे. भंगार व्यवसायाची व्याप्ती मोठी असलेल्या भागात प्रामुख्याने हा प्रकार दिसून येतो. भंगारातील सीएनजी किट बसविलेली अनेक वाहने सध्या रस्त्यावर आहेत. त्यामुळे रस्त्यावर आता हा नवा धोका निर्माण झाला आहे.

 

‘सीएनजी’च्या टाकीवरच विद्यार्थ्यांची आसने

शालेय वाहतुकीतील वाहनाला आग लागून मुंबईत झालेल्या दुर्घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी स्कूल बसची अत्यंत कठोर नियमावली राज्य शासनाने लागू केली आहे. या नियमावलीनुसार विद्यार्थी वाहतुकीतील वाहन पंधरा वर्षांपेक्षा जुने नसावे, या प्रमुख नियमाबरोबरच विद्यार्थी सुरक्षिततेचे विविध नियम आहेत. मात्र, बाद झालेली वाहने रंगरंगोटी करून विद्यार्थी वाहतुकीत वापरण्यात येत असल्याचे काही ठिकाणी दिसून येते. प्रामुख्याने उपनगरांमध्ये हे प्रकार होतात. या वाहनांना भंगारातील धोकादायक सीएनजी किट बसविण्यात येते. गंभीर बाब म्हणजे काही वाहनांमध्ये सीएनजीच्या टाकीवरच विद्यार्थ्यांची आसने असतात. आपला विद्यार्थी कोणत्या वाहनाने शाळेत येतो, हे तपासण्याची जबाबदारी नियमावलीनुसार शाळांचीही आहे. मात्र, बहुतांश शाळा त्याकडे दुर्लक्ष करतात.

थेट शाळांजवळ जाऊनच कारवाई हवी

नियमबाह्य़ पद्धतीने चालविल्या जाणाऱ्या स्कूल बसबाबत ‘आरटीओ’कडून अनेकदा कारवाई केली जाते. वाहने पकडून त्यांना दंडाची आकारणी केली जाते. ही कारवाई ठरावीक चौकात किंवा रस्त्यांवर केली जाते. ‘आरटीओ’कडील मनुष्यबळ विचारात घेता या कारवाईलाही मर्यादा येतात. त्यामुळे विद्यार्थी वाहतुकीतील धोकादायक वाहने वाहतुकीतून पूर्णपणे काढून टाकण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या मदतीने थेट शाळांजवळ जाऊनच प्रत्येक वाहनांची तपासणी करून कारवाई केली जावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2017 12:02 am

Web Title: old cng kits used in pune
Next Stories
1 आगामी निवडणुकांसाठी शेतकरी संघटना, रासप आणि संग्राम परिषदेचा भाजपला प्रस्ताव
2 ‘शिवस्मारकाचा निधी मराठा समाजाच्या विकासासाठी वापरावा’
3 मातोश्रीचा जीव युतीत अडकलाय; अजित पवारांचा शिवसेनेला टोला
Just Now!
X