कांदा दरवाढ नियंत्रणात आणण्यासाठी इजिप्त, तुर्कस्तान, इराण येथून कांदा आयातीचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यामुळे परदेशातील कांदा दिवाळीत बाजारात मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध होणार आहे. या कांद्याची प्रतवारी महाराष्ट्रातील कांद्याएवढी नसली तरी सामान्यांना कमी दरात हा कांदा उपलब्ध होईल. त्या बरोबरच मध्यप्रदेश पाठोपाठ राजस्थानातील कांद्याची आवकही राज्यात सुरू झाल्यामुळे कांद्याचे दर आटोक्यात यायला सुरुवात झाली आहे.

किरकोळ बाजारात कांद्याचे प्रतिकिलोचे दर ६० ते ८० रुपयांवर गेल्यामुळे केंद्राने कांदा दरवाढ नियंत्रणात आणण्यासाठी कांदा आयातीचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर इजिप्त, तुर्कस्तान, इराण येथून कांदा मागवण्यात आला असून मुंबईतील बंदरात या कांद्याची आवक झाली आहे. राज्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये हा कांदा लवकरच येईल. त्यानंतर कांद्याचे स्थानिक बाजारपेठांमधील दर कमी होतील.

दरम्यान, राजस्थानातील अलवर कांद्याची आवकही राज्यात सुरू झाली आहे. राजस्थानातील अलवर परिसरातील शेतकरी कांद्याची लागवड करतात. या भागातील कांदा अलवर कांदा नावाने ओळखला जातो. राजस्थान, मध्यप्रदेशात कांद्याची लागवड केली जात असली तरी संपूर्ण देशभरात महाराष्ट्रातील कांद्याची प्रतवारी उत्तम समजली जाते. महाराष्ट्रपाठोपाठ कर्नाटकात  कांद्याची लागवड मोठय़ा प्रमाणावर केली जाते. संपूर्ण देशाची गरज महाराष्ट्रातील कांदा भागवितो. यंदाच्या वर्षी महाराष्ट्र आणि कर्नाटकात अतिवृष्टी झाल्याने नवीन कांद्याची रोपे शेतात वाहून गेली. नवीन हळवी कांद्याचा हंगाम डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात सुरू होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील नवीन कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे प्रतवारीवर परिणाम झाला आहे. जवळपास ७० टक्के नवीन कांद्याचे नुकसान झाले आहे, अशा परिस्थितीत महाराष्ट्रात चांगल्या प्रतीच्या कांद्याला दर मिळत असल्याने राजस्थान आणि मध्यप्रदेशातून कांदा बाजारात विक्रीस पाठविला जात असल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डातील कांदा व्यापारी रितेश पोमण यांनी दिली.

येथील मार्केटयार्डात सध्या राजस्थानातील अलवर भागातून कांदा विक्रीस पाठविला जात आहे. राजस्थानातील दहा किलो कांद्याला घाऊक बाजारात ३००  ते ४०० रुपये असा दर मिळाला आहे.

नाशिकमधील कांदा व्यापाऱ्यांवर कारवाई झाल्याने तेथील बाजार समिती आठवडाभर बंद ठेवण्यात आली होती. परिणामी मागणी, पुरवठा विस्कळीत झाला होता. त्यामुळे चांगल्या प्रतीच्या जुन्या कांद्याचे दर कमी झाले होते. घाऊक बाजारात दहा किलो कांद्याचे दर ८५० ते ९०० रुपयांवर गेले असताना कांदा आयातीचा निर्णय आणि कांदा व्यापाऱ्यांवर कारवाई झाल्याने कांदा दर नियंत्रणात आले. महाराष्ट्रातील जुन्या कांद्याला देशभरातून असलेली मागणी कायम आहे. मात्र, दरात घट झाल्याने सामान्यांना दिलासा मिळाला आहे.