शिक्षकांचे पगार वाढल्यामुळे उत्तरपत्रिकांच्या तपासणीसाठी शिक्षक मिळत नाहीत. त्यामुळे यापुढे उत्तरपत्रिकांची तपासणीही ऑनलाइन करण्याचे विचाराधीन आहे,’ असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी चिंचवड येथील एका कार्यक्रमात सांगितले.

चिंचवड येथील एका शिक्षणसंस्थेच्या कार्यक्रमाला तावडे सोमवारी आले होते. राज्यातील विद्यापीठांमध्ये लाखोंनी उत्तरपत्रिका जमा होत असतात, मात्र त्याचे मूल्यांकन करण्यासाठी पात्र शिक्षकांची संख्या कमी आहे. पात्र असलेले शिक्षकही अनेक वेळा उत्तरपत्रिकांच्या तपासणीच्या कामात टाळाटाळ करत असल्याची ओरड विद्यापीठांकडून करण्यात येत असते.

उत्तरपत्रिकांची तपासणी करण्यावर शिक्षकांना बहिष्कार घालता येणार नसला तरीही आहे ती शिक्षकसंख्याही विद्यापीठांना पुरी पडत नाही. त्यामुळे उत्तरपत्रिकांची तपासणी ऑनलाइन करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे, अशी माहिती तावडे यांनी दिली.

तावडे म्हणाले, ‘शिक्षकांचे पगार खूप वाढले असल्याने उत्तरपत्रिकांच्या तपासणीला शिक्षक मिळत नाहीत, त्याचा ताण इतर शिक्षकांवर पडतो. विद्यार्थ्यांच्या निकालांवरही परिणाम होतो. त्यामुळे यापुढे उत्तरपत्रिकांची तपासणीही ऑनलाइन करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे.’  ‘विद्यार्थ्यांचे मूल्यांकन गुणांच्या साहाय्याने करण्याबरोबरच त्यांच्यातील कौशल्य गुणांकडे लक्ष देणे आवश्यक आहे,’ असेही विनोद तावडे या वेळी म्हणाले.