पार्थ पवार दोन लाख १५ हजारांच्या फरकाने पराभूत

अतिशय नाटय़मय घडामोडींमुळे राज्यभरात चर्चेला आलेल्या मावळ लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीचे श्रीरंग बारणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ अजित पवार यांचा दोन लाख १५ हजाराहून अधिक मतांनी दणदणीत पराभव केला. ऐनवेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या पार्थ यांच्यासाठी राष्ट्रवादीने पूर्ण ताकद लावली होती. मात्र, तरीही भाजप-शिवसेना महायुतीच्या ताकदीसमोर राष्ट्रवादीचा निभाव लागू शकला नाही.

पुणे जिल्ह्य़ातील चिंचवड, पिंपरी, मावळ विधानसभा आणि रायगड जिल्ह्य़ातील पनवेल, उरण, कर्जत विधानसभा क्षेत्र मिळून तयार झालेल्या मावळ लोकसभेच्या रिंगणात २१ उमेदवार होते. प्रत्यक्षात बारणे आणि पवार यांच्यातच थेट लढत होती. तर, वंचित आघाडीचे राजाराम पाटील किती आणि कोणाची मते घेतात, याविषयी उत्सुकता होती.

बालेवाडी येथे गुरूवारी सकाळी मतमोजणी सुरू झाल्यानंतर बारणे यांनी सुरुवातीपासून पार्थ यांच्यावर आघाडी घेतली. शेवटच्या फेरीपर्यंत बारणे आघाडी टिकवून होते. मतमोजणी पूर्ण झाली तेव्हा बारणे यांनी सात लाख मतांचा टप्पा ओलांडला आणि पार्थ यांच्यावर दोन लाख १५ हजाराचे मताधिक्य घेतले. चिंचवड मतदारसंघातून बारणे यांना ९६ हजाराचे मताधिक्य मिळाले असून पनवेल मतदारसंघातून ५४ हजाराचे, मावळ विधानसभेतून २१ हजाराचे, िपपरी विधानसभेतून ४१ हजाराचे, उरणमधून अडीच हजाराचे मताधिक्य बारणे यांना मिळाले. पार्थ यांना केवळ कर्जतमधून जेमतेम १८५० मतांची आघाडी मिळाली होती. वंचित आघाडीच्या उमेदवाराने ७० हजार मतांचा टप्पा ओलांडला आहे.

माझ्यावर विश्वास दाखवणाऱ्या मतदारांचा मी ऋणी आहे. निवडणूक काळात ज्यांनी मनापासून काम केले, त्या सर्वाचे मी आभार मानतो. आमच्याकडून काही त्रुटी राहिल्या असतील, त्या भविष्यात नक्कीच सुधारू. नरेंद्र मोदी सरकारला जनतेने स्वीकारले आहे. जनतेचा कौल आम्हाला मान्य आहे.

– पार्थ पवार, उमेदवार, राष्ट्रवादी

रात्रीपासूनच फ्लेक्स

लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा पार पडल्यानंतर निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. गेल्या काही दिवसांपासून निकालाची कुजबुज सुरू झाली होती. मात्र, निकालाच्या आदल्या दिवशी, बुधवारी रात्रीच काही उमेदवारांच्या विजयाचे, खासदार झाल्याचे फ्लेक्स लागण्यास सुरुवात झाली. त्यात शिरूर मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे, पुण्याचे भाजपचे उमेदवार गिरीश बापट, मावळचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या विजयाचे फ्लेक्स रात्रीच ठिकठिकाणी लावून निकालाची वातावरण निर्मिती करण्यात आली होती. प्रत्यक्ष निकाल जाहीर झाल्यानंतर गुलाल उधळून, फटाके उडवून मोठा विजयोत्सव साजरा करण्यात आला.

दुपारनंतर रस्त्यांवर गर्दी

गेल्या दोन-तीन दिवसांपासून उष्णतेची लाट आल्यामुळे निकालाच्या दिवशी दुपापर्यंत राजकीय पक्षांचे कार्यकर्ते वगळता रस्त्यांवर विशेष गर्दी नव्हती. त्यामुळे मतमोजणीच्या परिसरात, रस्त्यांवर कार्यकर्त्यांची बऱ्यापैकी गर्दी होती. पहिल्या फेरीचा निकाल आणि आघाडी-पिछाडीच्या बातम्यांनंतर निकालाविषयी सर्वसामान्यांमध्ये चर्चा सुरू झाली. दुपारनंतर मात्र रस्त्यांवरही गर्दी दिसू लागली.