News Flash

एचआयव्ही नियंत्रणासाठी आता कंपन्या शासनाबरोबर काम करणार

‘महाराष्ट्र राज्य एडस् नियंत्रण संस्थे’ने (एमसॅक्स) यासाठी ‘एम्प्लॉयी लीड मॉडेल’ आणले असून पुण्यातील दहा मोठय़ा कंपन्यांशी एमसॅक्सची सहभागासाठी बोलणी सुरू आहेत.

| June 10, 2015 03:10 am

कायम व स्थलांतरित कामगारांमध्ये एचआयव्ही संसर्गाबद्दल जागृती निर्माण करणे, तसेच त्यांना एचआयव्ही तपासणी आणि उपचारांच्या सुविधा मिळवून देणे यासाठी आता कंपन्यांना सरकारबरोबर काम करण्याची संधी आहे. ‘महाराष्ट्र राज्य एडस् नियंत्रण संस्थे’ने (एमसॅक्स) यासाठी ‘एम्प्लॉयी लीड मॉडेल’ आणले असून पुण्यातील दहा मोठय़ा कंपन्यांशी एमसॅक्सची सहभागासाठी बोलणी सुरू आहेत. रांजणगावमधील ‘पेप्सिको’ कंपनीने गेल्या आठवडय़ात एमसॅक्सबरोबर करार केला असून या मॉडेलमध्ये सहभाग नोंदवणारी पुण्यातील ही पहिली कंपनी ठरली आहे.
पुणे जिल्ह्य़ात सार्वजनिक व खासगी क्षेत्रातील ९१ कंपन्या असून त्यांनी या मॉडेलमध्ये भाग घेतल्यास ३.५ ते ४ लाख कामगारांना लाभ होऊ शकेल, अशी माहिती ‘एमसॅक्स’चे प्रकल्प अधिकारी दीपक निकम यांनी दिली. राज्यात ९ कंपन्यांनी एम्प्लॉयी लीड मॉडेल स्वीकारले असून त्यात पुण्यासह कोल्हापूर, रायगड, औरंगाबाद आणि चंद्रपूरमधील कंपन्यांचा समावेश आहे.
‘नॅको’च्या (राष्ट्रीय एडस् नियंत्रण संस्था) अंतर्गत येणारी महाराष्ट्र राज्य एडस् नियंत्रण संस्था राज्यात एचआयव्हीचा प्रतिबंध आणि उपचार यासाठी काम करते. बाहेरच्या राज्यांमधून किंवा जिल्ह्य़ातून येऊन बांधकाम किंवा कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या स्थलांतरित कामगारांना एचआयव्हीविषयक सेवा पुरवण्यासाठी संस्थेतर्फे २००८ सालापासून सामाजिक संस्थांच्या साहाय्याने ‘टारगेटेड इंटरव्हेन्शन प्रोग्रॅम’ सुरू करण्यात आले होते. पुण्यात सध्या ८ सामाजिक संस्था हा कार्यक्रम चालवत असून १ लाख कामगारांना त्याचा लाभ मिळतो. परंतु ‘नॅको’च्या निरीक्षणानुसार हा कार्यक्रम पुरेसा नसल्याचे दिसून आले. त्यातून एचआयव्हीविषयक सेवांचे ‘एम्प्लॉयी लीड मॉडेल’ समोर आले. कंपन्यांकडे ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’साठी वेगळी यंत्रणा असते, कंपनीचे स्वत:चे वैद्यकीय अधिकारी व तपासणी यंत्रणाही असते. त्या साहाय्याने एचआयव्हीविषयी माहिती पुरवण्याबरोबरच तपासणी सुविधाही उपलब्ध करुन देता येतील, अशी एम्प्लॉयी लीड मॉडेलची संकल्पना आहे.
‘पुण्यातील १० कंपन्यांशी ‘एमसॅक्स’तर्फे या मॉडेलमध्ये येण्यासाठी बोलणी सुरू आहेत. बऱ्याच कंपन्या आपल्या कामगारांसाठी एचआयव्ही संबंधी काही ना काही काम करत असल्याचे दिसून येते. त्यामुळे कंपन्यांना या मॉडेलसाठी वेगळ्याने पैसे खर्च करावे लागणार नसून आपल्या प्रकल्पांमध्येच या मॉडेलचा समावेश करुन चालणार आहे. केवळ कामगारांना दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाच्या वेळी एचआयव्हीविषयीही बोलले गेले तरीही कामगारांमध्ये एचआयव्हीसंबंधीचा असलेला ‘स्टिग्मा’ कमी होण्यास मोठी मदत होते.’- दीपक निकम, प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र राज्य एडस् नियंत्रण संस्था
कंपन्यांना संपर्कासाठी निकम यांचा दूरध्वनी क्रमांक- ८६५७११११२१

काय आहे ‘एम्प्लॉयी लीड मॉडेल’?
– कंपनीतर्फे कामगारांसाठी एचआयव्हीविषयक जनजागृती.
– कंपनीच्या डॉक्टरांकरवी कामगारांची गुप्तरोगासाठी तपासणी. यातून एचआयव्हीचे संशयित रुग्ण कळू शकतील.
– ‘एमसॅक्स’तर्फे कामगारांसाठी एचआयव्ही तपासणीची सुविधा.
– एचआयव्ही रुग्णांना ‘एआरटी’ (अँटी रेट्रोव्हायरल ट्रीटमेंट) मिळवून देण्यासाठी ‘एमसॅक्स’तर्फे ‘रेफरल’ प्रमाणपत्र देणे. कामगार परराज्यातील किंवा परगावातील असेल तरीही त्याला तिकडे उपचार घेण्यासाठी असे प्रमाणपत्र मिळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2015 3:10 am

Web Title: pepsico will help govt in hiv control work
Next Stories
1 ‘फिल्म इन्स्टिटय़ूट’च्या धर्तीवर पंजाबमध्येही चित्रपट प्रशिक्षण संस्था उभारणार
2 दहावी, बारावीसाठी खेळाडूंना सरसकट गुण मिळणार
3 मान्सूनचा राज्यात प्रवेश
Just Now!
X