News Flash

पिंपरी राष्ट्रवादीचा ओढा अजित पवारांकडे

शहर राष्ट्रवादीतील नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा ओढा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेच आहे

राष्ट्रवादीचे रावेतचे नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी अशाप्रकारे अजित पवार यांचे फलक लावून नगरसेवकांची प्रातिनिधीक भावना व्यक्त केली आहे.

पक्षात संभ्रमावस्था, ज्येष्ठ नेत्यांचा सावध पवित्रा

पिंपरी : राज्याचे राजकारण ढवळून निघालेल्या पवार विरुद्ध पवार संघर्षांत पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यासह शहर राष्ट्रवादीतील नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा ओढा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेच आहे. सद्यस्थितीत राजकीय पटलावर संभ्रमावस्था असल्याने चित्र स्पष्ट होईपर्यंत सर्वानीच सावध भूमिका घेतल्याचे दिसत आहे.

पिंपरी शहर राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी रविवारी मुंबईत अजित पवारांना भेटले. सध्याच्या घडामोडीत आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत, असे त्यांनी अजितदादांना सांगितले. आमदार बनसोडे इतरांसाठी संपर्क क्षेत्राबाहेर असले तरी ते अजित पवार यांच्या संपर्कात आहेत. त्यांचाही कल अजित पवारांकडे आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशी थेट संपर्क असणाऱ्या काही नेत्यांनी मात्र सावध पवित्रा घेतला असून चित्र स्पष्ट होईपर्यंत वाट पाहण्याचा निर्णय घेतला आहे.

पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. काही वर्षांपूर्वीपर्यंत शहरावर राष्ट्रवादीचे एकहाती वर्चस्व होते. आता भाजपने शहरावर ताबा मिळवला असला तरी राष्ट्रवादीची ताकद कायम आहे. अजित पवार  जवळपास २५ वर्षांपासून शहराच्या राजकारणात सक्रिय आहेत. शहर राष्ट्रवादीचे सर्व निर्णय त्यांच्या आदेशानुसार होतात. अजित पवार म्हणतील  तीच पूर्व दिशा अशी परिस्थिती आहे. विद्यमान नगरसेवक आणि पदाधिकारी अजित पवार यांच्याच मर्जीतील आहेत. त्यामुळे दोन्ही पवारांपैकी कोण, असा अंतिम निर्णय घ्यायची वेळ आलीच तर अधिकाधिक  कार्यकर्ते अजित पवारांसमवेत राहतील, असे स्पष्ट चित्र आहे. तथापि, आताच या विषयी कोणी बोलण्याच्या मनस्थितीत नाही.

पक्षात संभ्रमावस्था नाही. मात्र, चित्र पूर्णपणे स्पष्ट होण्याची आम्ही सर्वजण वाट पाहात आहोत. इतक्यात कोणतेही भाष्य करणे घाईचे होईल.

– संजोग वाघेरे, पिंपरी शहराध्यक्ष, राष्ट्रवादी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2019 1:54 am

Web Title: pimpri ncp in favour of ajit pawar zws 70
Next Stories
1 शिवराज्याभिषेकावरील स्ट्रिंग चित्राची ‘एशिया बुक’मध्ये दखल
2 प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
3 जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांना २८ कोटी रुपयांची कर्जमाफी
Just Now!
X