टाळेबंदीनंतर मालवाहतुकीतील बहुतांश चालक मूळ गावी निघून गेल्याने जीवनावश्यकसह इतर वस्तूंच्या वाहतुकीसाठी चालकच नसल्याने निर्माण झालेला तिढा राज्याच्या परिवहन विभागाच्या निर्णयामुळे सुटणार आहे. चालकांअभावी मालवाहतुकीची तुटलेली साखळी साधण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या भागांत अडकून पडलेल्या चालकांना त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी जाण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडून परवाना उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. राज्य माल व प्रवासी वाहतूकदार संघटना आणि परिवहन विभागात झालेल्या चर्चेनंतर याबाबत तोडगा काढण्यात आला आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात टाळेबंद जाहीर झाल्यानंतर मालवाहतुकीत काम करणारे बहुतांश चालक मूळ गावी निघून गेले. त्यामुळे पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर आदी महत्त्वाच्या शहरांसह राज्य आणि देशातील मालवाहतुकीवर त्याचा परिणाम झाला. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरू असली, तरी सध्या केवळ वितरकांकडे असलेल्या वस्तू छोटे टेम्पो किंवा ट्रकच्या माध्यमातून  किरकोळ बाजारात पोहोचविण्यात येत आहे. मात्र, चालकच उपलब्ध नसल्याने सुमारे ९० टक्के मालवाहतूक बंद असल्याने मूळ कारखान्यातून मोठय़ा वितरकांकडे वस्तू पोहोचविण्याची साखळी तुटली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात अडकून पडलेल्या चालकांना त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी पोहोचविण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्याची मागणी वाहतूकदारांकडून करण्यात येत होती. ‘लोकसत्ता’नेही याबाबत वृत्त प्रसिद्ध करून सातत्याने हा प्रश्न मांडला.

राज्य माल व प्रवासी वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी बुधवारी (१५ एप्रिल) राज्याचे परिवहन आयुक्त शेखर चन्न्ो यांच्याशी या प्रश्नावर आणि वाहतूकदारांच्या मागणीबाबत दूरध्वनीवर सविस्तर चर्चा केली. ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झालेले वृत्तही त्यांना वाहतूकदारांकडून पाठविण्यात आले. वस्तुस्थिती आणि प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन चन्न्ो यांनी त्यावर तोडगा काढला. त्यानुसार वाहतूकदारांकडून संबंधित चालकांना व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून अधिकृत पत्र पाठविले जाईल. चालकांनी त्या-त्या जिल्ह्यतील प्रादेशिक परिवहन कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना हे पत्र आणि वाहन चालविण्याचा परवाना दाखविल्यानंतर त्यांना व्यवसायाच्या मूळ ठिकाणी जाण्याबाबत परवानगी उपलब्ध  करून  दिली  जाणार   आहे.

केंद्र शासनाने जीवनावश्यकसह सर्वच वस्तूंच्या वाहतुकीला परवानगी दिली. मात्र, चालकच नसल्याने मालवाहतुकीबाबत गंभीर समस्या निर्माण झाली. वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडलेल्या चालकांना त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी पोहोचविण्याच्या दृष्टीने आम्ही मागणी केली होती. परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेतला. त्यानुसार चालकांना व्यवसायाच्या ठिकाणी येण्यासाठी परिवहन विभागाकडून परवाना दिला जाणार आहे.

– बाबा शिंदे, राज्य माल व प्रवासी वाहतूकदार संघटना अध्यक्ष