मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर यांचा सत्कार करण्याच्या विषयावरून महापालिकेच्या मुख्य सभेत मंगळवारी रात्री जोरदार गोंधळ, वादंग, परस्पर विरोधात घोषणाबाजी आणि खुच्र्याची फेकाफेक झाली. या विषयाला विरोध करणारे भाजप-शिवसेनेचे सदस्य विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य यांच्यात सभेत जोरदात बाचाबाची झाली.
खेडेकर यांचा सत्कार करावा असा ठराव मुख्य सभेला देण्यात आला होता. मात्र त्यानंतर हा ठराव दफ्तरी दाखल (रद्दबातल) करावा अशी उपसूचना देण्यात आली असून तसा ठराव मंगळवारी रात्री मुख्य सभेपुढे येण्याची शक्यता निर्माण झाली होती. सभेत यावेळी काँग्रेस व राष्ट्रवादीचे बारा सदस्य होते, तर युतीच्या सदस्यांची संख्या चाळीसहून अधिक होती. हा विषय येण्यापूर्वी गावठाण भागात दोन एफएसआय द्यावा, यासंबंधीचा ठराव सभेपुढे निर्णयासाठी आला होता. या ठरावावरून वाद सुरू असतानाच त्यानंतरचा विषय खेडेकर यांच्या सत्काराचा ठराव रद्द करण्यासंबंधीचा होता.
खेडेकर यांचा सत्कार रद्द करण्याचा विषय मंजूर करा असा युतीच्या सदस्यांचा जोरदार आग्रह होता. त्यावरून वादंग सुरू झाले आणि काँग्रेस-राष्ट्रवादी व युतीच्या नगरसेवकांनी घोषणाबाजी सुरू केली. वाद आणि आरोप-प्रत्यारोप वाढत जाऊन वातावरण चांगलेच तापले. याचवेळी काँग्रेस-राष्ट्रवादीचे नगरसेवक सभागृहाबाहेर गेले आणि सभागृहनेत्यांनी गणसंख्या आहे का, असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी पुरेशी गणसंख्या नसल्याचे सांगण्यात आल्यानंतर वातावरण तापले आणि खुच्र्याची फेकाफेक झाली. बराच वेळ चाललेल्या या गोंधळातच कोणताही निर्णय न घेता अखेर सभा तहकूब करण्यात आली.