पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) हवेली तालुक्यातील उंड्री येथील दोन अनधिकृत बांधकामे गुरुवारी पाडण्यात आली. ‘पीएमआरडीए’च्या अनधिकृत बांधकाम विरोधी पथकाने ही कारवाई केली असल्याचे विभागप्रमुख अण्णासाहेब चव्हाण यांनी सांगितले.
अण्णासाहेब चव्हाण म्हणाले, उंड्री येथील मुरलीकृष्णा नागभूषणराव मंडिवली आणि सॅम्युअल मॅनीवर यांची सव्र्हे क्र. २८/२ अ येथील दोन बांधकामे पाडण्यात आली. या दोन्ही बांधकामांना एमआरटीपी कायद्यानुसार २ मार्च २०१६ रोजी नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. त्यानंतरही या दोन्ही बांधकामांना आवश्यक असणाऱ्या परवानग्या घेतल्याचे हे दोन्ही बांधकामधारक सिद्ध करू शकले नाहीत. त्याचबरोबर ही बांधकामे नियमानुकुल करण्याची कार्यवाहीही त्यांनी केली नाही. बजावण्यात आलेल्या नोटीसीमध्ये बांधकाम थांबविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या असतानाही बांधकाम सुरू ठेवण्यात आले होते. त्यानुसार त्यांच्याविरूद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात ७ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या कारवाईचा पुढील टप्पा म्हणून ही दोन्ही बांधकामे गुरुवारी पाडण्यात आली.
पीएमआरडीएचे आयुक्त महेश झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामांविरुद्ध यापुढे अधिक तीव्रतेने कारवाई करण्यात येईल, असे झगडे यांनी सांगितले. त्याचबरोबर नागरिकांनी सदनिका, घरे खरेदी करण्यापूर्वी त्या बांधकामास परवानगी आहे की नाही याची खात्री करावी, असे आवाहनही झगडे यांनी केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 13th May 2016 रोजी प्रकाशित
अनधिकृत बांधकामांवर ‘पीएमआरडीए’ ची कारवाई
पीएमआरडीएचे आयुक्त महेश झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 13-05-2016 at 04:23 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pmrda demolish illegal constructions in pune