राज्यातील तंत्रशिक्षण महाविद्यालयांमध्ये रॅगिंग झाल्यास त्यासाठी प्राचार्य जबाबदार असतील, असे स्पष्ट करतानाच रॅगिंग विरोधी समिती नेमण्याची सूचना तंत्रशिक्षण संचालनालयाने नव्या शैक्षणिक वर्षांच्या तोंडावर महाविद्यालयांना केली आहे.
राज्यातील तंत्रशिक्षण महाविद्यालयांमध्ये रॅिगगचे प्रमाण तुलनेने अधिक आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये राज्यातील विविध शिक्षणसंस्थांमधील रॅगिंगच्या ७४ तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.  त्यातील जवळपास ४० तक्रारी या तंत्रशिक्षण महाविद्यालयांतील आहेत. गेल्यावर्षी (२०१४) राज्यात रॅगिंगच्या सर्वाधिक तक्रारीं म्हणजे ४१ तक्रारींची नोंदणी झाली आहे. चालू वर्षांत (२०१५) ६ तक्रारींची नोंद झाली आहे. त्यातील ४ विद्यार्थिनी आहेत.
या पाश्र्वभूमीवर आता महाविद्यालयांमध्ये रॅगिंग झाल्यास त्यासाठी प्राचार्य जबाबदार असतील, असे पत्र तंत्रशिक्षण संचालनालयाने महाविद्यालयांना पाठवले आहे. ‘रॅगिंगची घटना घडल्यास प्राचार्याना जबाबदार मानून नियमानुसार कारवाई करण्यात येईल,’ असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. महाविद्यालयांमध्ये रॅगिंग विरोधी कृती समिती नेमण्यात यावी, विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण व्हावे यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, रॅगिंग हा गुन्हा असल्याबाबत विद्यार्थ्यांना माहिती द्यावी, त्यांच्यासाठी आवश्यक तेव्हा समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी अशा सूचनाही संचालनालयाने दिल्या आहेत.