लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपची सत्ता असलेल्या पिंपरी पालिकेवर काढण्यात येणारे मोर्चे आणि विविध विषयांवर होणाऱ्या आंदोलनांची संख्या कमालीची वाढली आहे. पाणी, स्वच्छता, पुनर्वसन यांसारख्या प्रश्नांबरोबरच पालिकेतील चुकीचे निर्णय आणि गैरप्रकारांच्या निषेधार्थ ही आंदोलने होत आहेत.

पालिकेच्या विविध प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेसने सातत्याने आंदोलनांचा धडाका लावला आहे. संघटनात्मक पातळीवर शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या माध्यमातून तर महापालिका पातळीवर विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या पत्रकबाजीतून सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील धार कायम ठेवण्यात आली आहे. चिखलीतील संतपीठाच्या कामात होत असलेल्या गैरव्यवहाराच्या विरोधात राष्ट्रवादीने अलीकडेच टाळमृदुंगाचे आंदोलन केले.

शहर काँग्रेसने सचिन साठे यांच्या नेतृत्वाखाली केंद्र, राज्य तसेच स्थानिक मुद्दय़ांचे विषय घेत आंदोलनांचा सपाटा लावला आहे. चिंचवडला मुख्यमंत्र्यांनी शास्तीकराचा निर्णय घेण्याची घोषणा केल्यापासून भाजपविरोधी सर्व पक्षांनी एकत्र येऊन राजकीय आंदोलन सुरू केले. त्यांच्या काऊंट डाऊन आंदोलनाचा फलक सत्ताधाऱ्यांनी काढायला लावला, त्याचे भांडवल करत विरोधकांनी पुन्हा आंदोलन केले. अशाच पद्धतीचे विरोधकांचे गाजर आंदोलनही झाले होते. पालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाला विरोध करण्यासाठी दापोडीतील पाच झोपडपटय़ांच्या रहिवाशांनी एकत्रितपणे महापालिका मुख्यालयावर मोर्चा आणला. सर्वपक्षीय स्थानिक लोकप्रतिनिधींनी मोर्चाचे नेतृत्व केले होते. वाकडच्या पाण्याच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी विविध सोसायटय़ांमधील रहिवाशांनी  मुख्यालयावर मोर्चा आणला, तेव्हा स्थानिक नगरसेवकांचे आंदोलनाला पाठबळ होते. भोसरी रुग्णालयाच्या खासगीकरणाच्या निषेधार्थ पिंपरीत सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. बेकायदा टॉवरच्या विरोधात पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या मुख्य कार्यालयावर नागरिकांनी मोर्चा काढला. घरकुल धारकांच्या विविध प्रश्नांसाठी ठराविक कालावधीनंतर महापालिकेवर मोर्चे काढण्यात आले. घरकुल प्रकल्पाला राजकीय नेत्याचे नाव न देण्याच्या मागणीसाठी अलीकडेच मोर्चा काढण्यात आला.

भाजपचे काम चांगलेच आहे. पिंपरी पालिका असो की पिंपरी प्राधिकरण असो. सामान्य नागरिक केंद्रिबदू मानून काम सुरू आहे. विरोधकांकडून मोर्चे, आंदोलने करत राजकीय स्टंटबाजी सुरू आहे. निवडणुकांच्या तोंडावर आम्ही काहीतरी करतो आहोत, हे दाखवण्यासाठी आणि आपले अस्तित्व दाखवण्यासाठी त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे.    – सदाशिव खाडे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण

सत्ताधाऱ्यांची मनमानी सुरू आहे. विकासकामांच्या नावाखाली त्यांचा भ्रष्टाचार सुरू आहे. प्रत्येक निविदेत संगनमत होत असून भाजपचे नेते तसेच पालिका आयुक्त डोळेझाक करत आहेत. पालिकेत कधी नव्हे ती भाजपला सत्ता मिळाली आहे. त्यामुळे असे प्रकार सुरू आहेत.   – जितेंद्र ननावरे, संघटक, शिवसेना</strong>