19 September 2020

News Flash

पुण्यात दुसऱ्या दिवशीही उच्चांकी तापमान

उकाडय़ात आणखी वाढ होण्याची शक्यता

(संग्रहित छायाचित्र)

उकाडय़ात आणखी वाढ होण्याची शक्यता

पुणे शहर आणि परिसरामध्ये सलग दुसऱ्या दिवशी उच्चांकी कमाल तापमानाची नोंद झाली. गुरुवारी तापमानाचा पारा ४१.६ अंश सेल्सिअसवर गेल्याने उन्हाचा चटका आणि उकाडय़ाने पुणेकर हैराण झाले आहेत. राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा असल्याने पुणे शहर आणि परिसरातील तापमानामध्ये पुढील दोन दिवस आणखी वाढ होण्याची शक्यता पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आली आहे. गुरुवारचे कमाल तापमान गेल्या नऊ वर्षांतील उच्चांकी तापमान आहे.

एप्रिलच्या तिसऱ्या आठवडय़ातील पावसाळी स्थितीनंतर शहरातील तापमानाचा पारा ३७ ते ३८ अंशांवर आला होता. मात्र, निरभ्र आकाशाची स्थिती आणि कोरडय़ा हवामानामुळे तापमानात झपाटय़ाने वाढ झाली. २३ एप्रिलला कमाल तापमानाचा पारा यंदाच्या हंगामात पाचव्यांदा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदविला गेला. त्यानंतर दोन दिवस त्यात वाढ नोंदविली जात आहे. बुधवारी शहरात ४१.१ अंश कमाल तापमानाची नोंद झाली. त्यात आणखी वाढ होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली होती. त्यानुसार गुरुवारी शहरातील कमाल तापमानाचा पारा ४१.६ अंशांवर गेला. सरासरीच्या तुलनेत हे तापमान तब्बल ३.६ अंशांनी अधिक आहे.

गुरुवारी नोंदविलेले कमाल तापमान नऊ वर्षांतील उच्चांकी तापमान ठरले आहे. २००९ मधील एप्रिल महिन्यातील ३० तारखेला शहरात ४१.७ अंश कमाल तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर पहिल्यांदाच शहरात उच्चांकी तापमानाची नोंद झाली. सकाळी दहापासूनच उन्हाचे चटके जाणविण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे घरातून बाहेर पडणे कठीण झाले होते. दुपारी उन्हाच्या तीव्र झळांनंतर संध्याकाळच्या सुमारास आकाश अंशत: ढगाळ झाल्यानंतर अंगातून घामाच्या धारा वाहात होत्या. पुढील दोन ते तीन दिवस आकाश मुख्यता निरभ्र राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज आहे.

रात्रीच्या तापमानवाढीनेही पुणेकर हैराण

कमाल तापमानात वाढ होत असताना दिवसा उन्हाच्या चटक्यांचा अनुभव मिळत असतानाच रात्रीच्या किमान तापमानातही शहरात लक्षणीय वाढ नोंदविण्यात येत आहे. गेल्या आठवडय़ात १८ ते १९ अंश सेल्सिअसवर असलेल्या किमान तापमानात झपाटय़ाने वाढ सुरू आहे. एकाच आठवडय़ात किमान तापमानात पाच ते सहा अंशांनी वाढ होत ते गुरुवारी २५.१ अंशांवर पोहोचले. त्यामुळे रात्रीच्या उकाडय़ाने पुणेकर हैराण झाले आहेत. त्यात एक-दोन दिवस आणखी वाढ होण्याची शक्यता पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2019 1:50 am

Web Title: pune current weather
Next Stories
1 मुलाखत : मतदारांच्या तक्रारींचे प्रमाण यंदा अल्प
2 नाटक बिटक : रंगालय छोटेखानी रंगावकाश!
3 वाढत्या तापमानामुळे पुण्यात दुपारच्या सत्रात मतदानावर परिणाम
Just Now!
X