शहरात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी

पुणे : पुणे शहर आणि परिसरात तापमानात सध्या झपाट्याने बदल होत आहेत. गेल्या केवळ आठ दिवसांच्या कालावधीत शहरात हंगामातील नीचांकी आणि उच्चांकी तापमानाची नोंद झाली. १२ नोव्हेंबरला शहरात नीचांकी ९.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती. शुक्रवारी (१९ नोव्हेंबर) तापमानाचा हा पारा थेट हंगामातील उच्चांकी २०.३ अंशांवर पोहोचला. दिवसाच्या किमान तापमानाचा पाराही ३३.३ अंशांपर्यंत गेला होता. दरम्यान, पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी शुक्रवारी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.

शहरात कोरडे हवामान आणि निरभ्र आकाशाच्या स्थितीमुळे नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून तापमानात घट होण्यास सुरुवात झाली होती.  दुसऱ्या आठवड्यामध्ये तापमानाचा पारा चांगलाच घसरल्याने शहरात थंडी अवतरली होती. तीन ते चार दिवस रात्रीच्या किमान तापमानाचा पारा ११ ते १३ अंशांवर होता. त्यानंतर १२ नोव्हेंबरला रात्रीच्या तापमानात एकदमच घट होऊन ते यंदाच्या हंगामातील नीचांकी पातळीवर म्हणजेच ९.८ अंशांवर पोहोचले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली होती. गेल्या आठवड्यापासून शहरात अंशत: ढगाळ स्थिती निर्माण झाली आहे. आठ दिवसांपूर्वी १० अंशांखाली गेलेला किमान तापमानाचा पारा आठच दिवसांत २० अंशांच्या पुढे गेला. हे तापमान सरासरीच्या तुलनेत तब्बल ६ अंशांनी अधिक आहे. त्यामुळे आठच दिवसांत कडाक्याच्या थंडीपासून रात्रीचा हलका उकाडा नागरिकांनी अनुभवला. ३० अंशांखाली गेलेले दिवसाच्या कमाल तापमानातही शुक्रवारी ३३.३ अंश सेल्सिअस ही मोठी वाढ नोंदविली गेली.

हवामानाची पुढील स्थिती

पुणे शहर आणि परिसरामध्ये २० नोव्हेंबरलाही आकाश अंशत: ढगाळ राहणार आहे. शहर, जिल्ह्यांत काही भागांत हलक्या सरी कोसळू शकतात. २१ नोव्हेंबरनंतर मात्र आकाश मुख्यत: निरभ्र राहणार आहे. परिणामी रात्रीच्या किमान तापमानात काही प्रमाणात घट होईल, असे पुणे वेधशाळेचा अंदाज आहे.२५ नोव्हेंबरपर्यंत किमान तापमान १६ ते १८, तर कमाल तापमान ३२ ते ३३ अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.