|| प्राची आमले

फेसबुक असो किंवा व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम असेल किंवा ब्लॉग.. आपल्याकडे असलेली माहिती अनेकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांचा वापर केला तर त्याला त्वरित आणि भरपूर प्रतिसाद मिळतो. त्याचाच प्रत्यय म्हणजे पुणे मॅक्रोगाफर्सनी भरवलेलं ‘सूक्ष्म’ नावाचं छायाचित्र प्रदर्शन. मॅक्रो फोटोग्राफी करणाऱ्या तरुणांनी फेसबुकवर एकत्र येत नुसती फोटोग्राफीच केली नाही, तर समृद्ध जैवविविधतेची माहिती अनेक उत्साही मंडळींपर्यंतसुद्धा नेली.

समाजमन बिघडवणारे माध्यम अशी समाजमाध्यमांची प्रतिमा तयार होत असताना, याच समाजमाध्यमांचा चांगला वापर करत विविध छंद जोपसणाऱ्या आणि वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या छायाचित्रप्रेमी तरूणांनी एकत्र येत दुर्मीळ छायाचित्रांचे दर्शन समाजाला घडवण्याचा प्रयत्न चालवला आहे. घराच्या बाल्कनीतील कुंडीत असणारा एखादा छोटा किटक असो वा स्वयंपाकघरातील मोहरी.. त्यांच्यातील  सौंदर्य उलगडणाऱ्या सूक्ष्म छायाचित्रणाची आगळीवेगळी संकल्पना घेऊन सूक्ष्म छायाचित्रणाचा छंद जोपासण्याचे काम‘पुणे मॅक्रोग्राफर्स’ हा गट करत आहे. ज्या वस्तू अथवा कीटक नुसत्या डोळ्यांनी पाहता येऊ शकत नाहीत, अशा वस्तू आणि कीटकांचे विश्व टिपण्याचे कार्य या गटाच्या माध्यमातून केले जाते.

वन्यजीव छायाचित्रांपलीकडे खास सूक्ष्म छायाचित्रणासाठी २०१४ साली अन्वय नाकाडे आणि योगेंद्र जोशी या हौशी छायात्रिकारांनी एकत्र येऊन पुण्यामध्ये या अनौपचारिक गटाची स्थापना केली. सध्या या गटाचे २० ते ३० छायाचित्रकार एकत्र येऊन सुटीच्या दिवशी सूक्ष्म फोटोग्राफी करतात. तसेच फेसबुकच्या माध्यमातून ४०० ते ४५० हौशी छायाचित्रकार या गटाशी जोडले गेले आहेत. गटाच्या  माध्यमातून एकत्र येऊन छायाचित्रण करणे, परस्परांमध्ये माहितीची देवाण घेवाण करणे असे उपक्रम सध्या मॅक्रोग्राफर्सतर्फे सुरू आहेत.

या गटातील पुष्कर अच्युते म्हणाला,की आपल्या आसपास असणाऱ्या अनेक वस्तू नुसत्या डोळ्यांनी नीट पाहता येऊ शकत नाहीत. अशा वस्तू व कीटकांचे सौंदर्य कॅमेऱ्यात टिपण्यात येते. मॅक्रो फोटोग्राफी हा अवघड प्रकार असून अशा प्रकारचे छायाचित्रण करण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या लेन्सेस, अद्ययावत यंत्रसामग्री आणि विशिष्ट तंत्र  लागते. साधारणत: ९० एमएस ते १०० एमएस मॅक्रो लेन्सद्वारे या प्रकारचे छायाचित्रण केले जाते.

मॅक्रोफोटोग्राफी म्हणजे फक्त किटकांचे फोटो काढणे नव्हे, तर या प्रकारच्या छायाचित्रणामध्ये कोणत्याही वस्तूचा, पदार्थाचा अतिशय सूक्ष्म भाग घेऊन त्यांना ‘लार्जर दॅन लाईफ’ दाखविण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो. अच्युते म्हणाला, या गटात फक्त छायाचित्रणप्रेमी नसून अगदी वय वर्ष १५ पासून ते निसर्गतज्ज्ञ, प्राणिशास्त्राचा अभ्यास करणारे प्राध्यापक यांचा समावेश आहे. फक्त छायाचित्र टिपणे एवढेच नव्हे तर एखादा कीटक वा माशी कोणत्या जातीची आहे हे जाणून घेण्यासाठी ते छायाचित्र फेसबुवर टाकल्यास त्याविषयी सर्व माहिती तुम्हाला मिळू शकते. फक्त पुण्यातीलच नव्हे, तर राज्यातील अनेक हौशी, तज्ज्ञ छायाचित्रकार समाज माध्यमांद्वारे या गटाशी जोडले गेले आहेत.

मॅक्रोग्राफर्सतर्फे २९ जून ते १ जुलै दरम्यान सूक्ष्म छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाला पुणेकर छायाचित्रप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रदर्शनात आलेल्या छायाचित्रण प्रेमींसाठी ‘सेल्फी विथ फोटोग्राफ’ ही स्पर्धा घेण्यात आली. त्यात, प्रदर्शनातील आपल्या आवडीच्या छायाचित्रासह एक सेल्फी घेऊन फेसबुक, इन्स्टाग्रामवर पोस्ट करायची. पोस्ट केलेल्या सेल्फींपैकी दोन विजेत्यांना बक्षीस देण्यात आले.

या गटातर्फे घेण्यात येणाऱ्या उपक्रमांविषयी अच्युते म्हणाला, गटातर्फे शहरातील वेगवेगळया टेकडय़ांवर तसेच घाट परिसरात जाऊन फोटोग्राफी वॉक, मॅक्रो वॉक यासारखे उपक्रम राबविण्यत येणार आहेत. प्रदर्शनाला अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद मिळाला आणि लोकांची प्रतिक्रिया पाहता गटाचे काम अधिक व्यापक स्वरुपात होणार असून नवनवीन उपक्रम छायाचित्रप्रेमींसाठी सुरू करणार आहोत. फेसबुकवर व इन्स्टाग्रामवर हा गट असून तुम्हीही या गटात सहभागी होऊ शकता.