करोना विषाणूमुळे जगभरात हजारो निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. या आजाराचे रुग्ण देशभरासह राज्यात मोठ्या प्रमाणावर आढळत आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकार व स्थानिक प्रशासनाकडून विशेष दक्षता घेतली जात आहे. याचाच एक भाग म्हणून पुण्यातील पीएमपीएमएलच्या कात्रज डेपो मधील इंजिन विभागात काम करणारे राजेश पवार यांनी सॅनिटायझर फवारणी करणारे मशीन बसमध्ये बसविले आहे. अशा प्रकारची फवारणी यंत्रणा असणारी ही बस शहरातील एकमेव मानली जात आहे. यामुळे बसमध्ये बसणारा प्रत्येक प्रवासी सॅनिटायझ होणार आहे.

यावेळी कर्मचारी राजेश पवार यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आम्ही सर्व कर्मचारी विशेष काळजी घेत आहोत. आपल्या प्रवाशाची देखील काळजी घेतली पाहिजे. त्या दृष्टीने मी आणि माझ्या सहकाऱ्यांमध्ये आपण काय करू शकतो, अशी चर्चा सुरू होती. तेव्हा बसच्या पुढील आणि मागील बाजूच्या दरवाजाच्या वरील जागेवर एका पॉईंटच्या माध्यमातुन सॅनिटायझरची फवारणी होऊ शकते, असे चर्चेतून ठरले. त्यानुसार आम्ही इंजिनाच्या बाजूला एक 20 लिटरची टाकी तयार केली आणि तेथून छोट्या पाईपद्वारे प्रयोग करून पाहिला. त्यामध्ये यश देखील आले आहे. आता त्यामुळे बसमध्ये चढणारा प्रत्येक प्रवासी अगोदर सॅनिटायझ होणार आहे.