वीस गाडय़ांपासून २४० गाडय़ांचा प्रवास
पुणे : इंग्रजांच्या काळातही पुणे हे लष्कराचे एक महत्त्वाचे ठाणे असल्याने येथील रेल्वेसाठी इंग्रजांनी विशेष लक्ष दिले होते. त्यामुळेच मुंबईमध्ये भारतातील पहिली रेल्वे धावल्यानंतर पुढील पाच ते सहा वर्षांतच पुण्याची रेल्वे सुरू झाली.. काही दिवसांत रेल्वे स्थानकासाठी विशेष रचनेची एक देखणी इमारत उभी राहिली आणि मोठय़ा दिमाखात तिचे उद्घाटन झाले, तो दिवस होता २७ जुलै १९२५.. ऐतिहासिक वारसा असलेली ही इमारत शुक्रवारी (२७ जुलै) चौऱ्याण्णव्या वर्षांत पदार्पण करीत आहे. स्थानकात दररोज ये-जा करणाऱ्या वीस गाडय़ांपासून २४० गाडय़ांपर्यंतचा प्रवास या इमारतीने अनुभवला आहे.
पुणे स्थानकाच्या इमारतीचा पहिला आराखडा पी. विल्सन यांच्या मार्गदर्शनाखाली १९१५ मध्ये तयार करण्यात आला होता. त्यानंतर १९२२ मध्ये इमारतीचे काम सुरू करण्यात आले. पुढील तीनच वर्षांत मुख्य अभियंता जेम्स बेर्कक्ले यांच्या नियोजनाखाली बांधकाम पूर्ण झाले. इमारतीचे उद्घाटन मुंबईचे गव्हर्नर सर लेस्ली विल्सन यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या समारंभासाठी मुंबईहून एक विशेष रेल्वे करण्यात आली होती. ही इमारत बांधण्यासाठी त्या वेळी पाच लाख ७९ हजार ६६५ रुपये इतका खर्च आला होता.
स्थानकाच्या इमारतीचाच नव्हे, पुणे स्थानकाचा संपूर्ण इतिहास तोंडपाठ असलेल्या रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षां शहा या दरवर्षी इमारतीचा वाढदिवस साजरा करतात. इमारतीचा सहस्रचंद्रदर्शन सोहळाही त्यांनी मोठय़ा दिमाखात साजरा केला होता. पुणे स्थानकावरील भार आता वाढतो आहे. इमारतीचा ऐतिहासिक वारसा जपून वाढत्या प्रवासी संख्येनुसार स्थानकाची क्षमता वाढविण्याची सध्या गरज आहे. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने निर्णय घ्यावेत, असे मत शहा यांनी व्यक्त केले.
पानशेतचा पूर, कोयनेच्या भूकंपाचा धक्का!
तब्बल ९३ वर्षे दिमाखात उभ्या असलेल्या पुणे रेल्वे स्थानकाच्या इमारतीला काही वर्षांपूर्वी ‘मॉडेल रेल्वे स्थानक’ म्हणूनही मान्यता मिळालेली आहे. त्याचप्रमाणे तिला ऐतिहासिक वास्तूचा दर्जाही मिळालेला आहे. इमारतीच्या उद्घाटनानंतर १९२९ मध्ये पुणे स्थानकावरून विजेवरील पहिली रेल्वे धावली. १९३० मध्ये जागतिक कीर्तीची डेक्कन क्वीन गाडी सुरू झाली. आशिया खंडातील पहिली डबल डेकर सिंहगड एक्स्प्रेसही त्याच दरम्यान सुरू झाली. त्याचप्रमाणे पानशेतचा पूर, कोयनेचा भूकंप असे विविध धक्केही या इमारतीने अनुभवले आहेत. पुणे स्थानकाच्याच आराखडय़ानुसार सध्याच्या पाकिस्तानातील लाहोर येथील रेल्वे स्थानकाची इमारत उभारण्यात आली.