देशातील महत्त्वाच्या संस्थांमध्ये सध्या संघाची विचारसरणी मान्य असलेल्या तसेच भारतीय जनता पक्षाशी संबंध असलेल्या लोकांना घुसवण्याचा प्रयत्न सुरू आहे. संघाच्या विचारधारेविरुद्ध केवळ काँग्रेस पक्षच लढू शकतो, असे प्रतिपादन काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी काँग्रेस भवनातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना केले. पक्षातील गटबाजी कमी करण्याचाही सल्लाही त्यांनी या वेळी पदाधिकाऱ्यांना दिला.
राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्यानिमित्त पक्षाचे शहर व जिल्हा स्तरावरील पदाधिकारी तसेच लोकप्रनिधींची बैठक काँग्रेस भवनात आयोजित करण्यात आली होती. बैठकीतील भाषणात राहुल गांधी यांनी मोदी सरकार तसेच संघावर टीका केली आणि पक्षातील गटबाजीबाबतही भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत कोणतेही काम केलेले नाही. पुढील चार वर्षांतही ते काही करू शकणार नाहीत. त्यांच्याकडे केवळ ध्रुवीकरणाचे कार्ड आहे आणि ध्रुवीकरण करून समाजात भांडणे घडवणे एवढेच काम ते करू शकतात, असे गांधी म्हणाले. भाजपच्या या विचारधारेच्या विरोधात आपल्याला लढावे लागेल असे सांगून ते म्हणाले, की देशात सध्या महत्त्वाच्या संस्थांमध्ये संघ व भाजपशी संबंध असलेल्या लोकांना घुसवण्याचा प्रयत्न सुरू आहे. संघाच्या विचारधारेबरोबर केवळ काँग्रेस पक्षच लढू शकतो. ‘अच्छे दिन’ची घोषणा भाजपने केली असली, तरी अनेक राज्यांत घोटाळे उघडकीस आले आहेत.
काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी आहे आणि ती कमी करावी लागेल. काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी प्रत्येकाने पक्षाचा कार्यकर्ता म्हणून पक्षासाठी काम करावे, असेही आवाहन त्यांनी केले.
शहराध्यक्ष अभय छाजेड, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, राज बब्बर, चिरंजीवी, अभिनेत्री खुषबू, पक्षाचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष कमल व्यवहारे, आमदार दीप्ती चवधरी, उपमहापौर आबा बागूल, महापालिकेतील गटनेता अरविंद शिंदे, तसेच मोहन जोशी, रमेश बागवे यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. शहर काँग्रेसतर्फे या वेळी पगडी, उपरणे आणि स्मृतिचिन्ह देऊन गांधी यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक अभय छाजेड यांनी केले. उपमहापौर बागूल यांनी आभार मानले.
उल्हास पवार यांचा गौरव
बैठकीत सुरुवातीला पुण्याचा सांस्कृतिक आणि राजकीय इतिहास ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी राहुल गांधी यांना सांगितला. त्यानंतर गांधी यांनी पवार यांचा भाषणात आवर्जून गौरव केला. पवार यांचा वाढदिवस असल्याचे उपस्थित पदाधिकाऱ्यांनी गांधी यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी उल्हास पवार यांना हार घातला आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.