मतांच्या मागे लागण्यापेक्षा लोकांची मने जिंकण्याचा प्रयत्न करा, असा सल्ला कार्यकर्त्यांना देतानाच पक्षातील प्रत्येकाला पक्षशिस्त पाळावीच लागेल. पक्षाचा जो पदाधिकारी त्याच्या वाढदिवसाचे फलक लावेल, त्याची लगेच पदावरून हकालपट्टी केली जाईल, असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिला.
विधानसभा निवडणुकांनंतर राज ठाकरे ‘कार्यकर्ता संवाद’ या कार्यक्रमासाठी गेले पाच दिवस पुण्यात होते. त्यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि कार्यकर्त्यांच्या तक्रारी व अपेक्षाही ऐकून घेतल्या. त्यांच्या या दौऱ्यानिमित्त शनिवारी शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी लोकांमध्ये जाऊन कशा पद्धतीने काम केले पाहिजे, याचे मार्गदर्शनही त्यांनी या वेळी केले.
पदाधिकाऱ्याच्या वाढदिवसाचे फलक लागलेले दिसल्यास ज्याने ते फलक लावले असतील, त्याची पदावरून हकालपट्टी केली जाईल, असे राज यांनी या वेळी पदाधिकाऱ्यांना बजावले. सतत आंदोलने करणे म्हणजे पक्षकार्य नाही. तुम्ही लोकांमध्ये काम करताना तुमच्या कामाचे वेगळेपण लोकांना दिसले पाहिजे. लोकांची कामे करून लोकांची मने जिंकण्याचा प्रयत्न करा. लोक तुम्हाला मते देतील, असेही राज म्हणाले. वाढदिवसाचे फलक लावणे म्हणजे पक्षाचे काम नव्हे. फक्त फलक लावून काम होत नाही. त्यासाठी लोकांमध्ये फिरा, त्यांची कामे करा, असेही त्यांनी सांगितले.
मेळाव्यात राज यांनी पक्षाच्या शिस्तीबाबतही कार्यकर्त्यांना सुनावले. पक्षाची शिस्त सर्वाना पाळावीच लागेल. त्या बाबत आतापर्यंत काय झाले ते झाले. यापुढे मात्र बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही. पक्षात जे बेशिस्त करतील त्यांना घरचा रस्ता दाखवला जाईल, असे ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीत पक्षाला यश मिळाले नसले, तरी लोकांची मात्र आपल्याकडून खूप अपेक्षा आहे. त्यासाठी लोकांच्या काय अपेक्षा आहेत, ते लोकांमध्ये जाऊनच समजून घेतले पाहिजे. फक्त मतदारयादी घेऊन काम करण्यापेक्षा त्या यादीतील प्रत्येक नागरिकाची माहिती आपल्याकडे हवी, असेही राज यांनी सांगितले. पक्षाच्या कामाबद्दल, पक्षवाढीबद्दल ज्यांच्याकडे काही चांगल्या योजना असतील, त्यांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा. दर महिन्याने मी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहे, असेही ते म्हणाले.