22 January 2021

News Flash

अभियांत्रिकी महाविद्यालयांची प्रवेश क्षमता घटणार

महाविद्यालयांना त्यांच्या काही शाखा बंद करण्याची सूचनाही देण्यात आली आहे.

अपुरी शिक्षकसंख्या, पायाभूत सुविधा आवश्यक प्रमाणात नसणे अशा त्रुटी असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांवर अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) कारवाईचे पाऊल उचलले असून राज्यातील साधारण १३० महाविद्यालयांची प्रवेश क्षमता कमी करण्यात आली आहे. काही महाविद्यालयांना सायंकाळी चालणारे अभ्यासक्रम बंद करण्याची सूचना देण्यात आली आहे, तर काही महाविद्यालयांना या वर्षी प्रवेश घेण्यास मनाई करण्यात आली आहे.

त्रुटींची पूर्तता करण्याबाबत वारंवार सूचना देऊनही ती न पाळणाऱ्या राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांवर एआयसीटीईने कारवाई सुरू केली आहे. त्रुटी असलेल्या १४७ महाविद्यालयांची यादी तंत्रशिक्षण संचालनालयाने एआयसीटीईला दोन महिन्यांपूर्वी दिली होती. या महाविद्यालयांची एआयसीटीईकडून सुनावणी घेण्यात आली. त्याबाबतचा अंतिम अहवाल पश्चिम विभागीय कार्यालयाकडून तयार करण्यात आला आहे. त्यानुसार साधारण १३० महाविद्यालयांची प्रवेश क्षमता १० ते २५ टक्क्य़ांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर महाविद्यालयांना त्यांच्या काही शाखा बंद करण्याची सूचनाही देण्यात आली आहे. दुसऱ्या पाळीत चालणारे अनेक अभ्यासक्रम बंद करण्याबाबतही महाविद्यालयांना सूचना करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे काही महाविद्यालयांना या वर्षी नव्याने प्रवेश करण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. मात्र याबाबतचा अंतिम अहवाल अद्याप तयार झाला नसल्याचे एआयसीटीईतील कर्मचाऱ्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2016 12:32 am

Web Title: reducing the ability to access of engineering colleges
Next Stories
1 ‘जेईई-मेन्स’चा निकाल जाहीर
2 शिक्षण संचालकांचा जंगी निरोप समारंभ; दानशूर होण्याचे संघटनांचे शिक्षकांना आवाहन
3 ‘सणसणीत श्रीमुखात..’ अग्रलेखावर मत नोंदवा
Just Now!
X