पुण्यातील १३५ शाळांच्या सर्वेक्षणातील निष्कर्ष

विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातील सुमारे ५० टक्के शाळांना सुधारणेला वाव आहे. या शाळांची आर्थिक परिस्थिती नाजूक असून मुलांवर मूल्याधिष्ठित शिक्षण आणि संस्कार होणे अपेक्षित असताना तसे घडत नाही. त्यामुळे या शाळा या विद्यार्थिकेंद्री होण्याऐवजी अधिकाधिक व्यवस्थापनकेंद्री होत आहेत. तसेच शाळांच्या मुख्याध्यापकांचे अधिकार वाढवण्याची गरज आहे. १३५ शाळांच्या सर्वेक्षणातून हा निष्कर्ष पुढे आला आहे.

बिझनेस एथिक्स फाउंडेशन आणि हॉलमार्कतर्फे १३५ शाळांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले.  वास्तव्यासाठी योग्य असणारे पुणे शहर देशामध्ये पहिल्या क्रमांकावर असताना येथील शिक्षणाचा आणि  विशेषत: शालेय शिक्षणाचा स्तर मात्र आठव्या क्रमांकावर  गेला आहे, अशी माहिती बिझनेस एथिक्स फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एस. जी. बापट यांनी मंगळवारी दिली.

या सर्वेक्षणात सहा संशोधक तज्ज्ञांसह ३० अभ्यासकांनी सहभाग घेतला होता. मूल्याधिष्ठित शिक्षणाबाबत पुण्यातील निवडक शाळांच्या परिस्थितीची शास्त्रशुद्ध पाहणी करण्यात आली. संस्थाचालक, मुख्यााध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक या सर्व घटकांचा सर्वागीण विचार करून एक प्रश्नावली देण्यात आली होती, असेही त्यांनी सांगितले.

या सर्वेक्षणाची विस्तृत माहिती देणाऱ्या पुस्तिकचे शुक्रवारी (३१ऑगस्ट) ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म.जोशी यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. टिळक रस्त्यावरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमात ‘माध्यमिक शिक्षणातील आव्हाने आणि संधी’ या विषयावर एक विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर या चर्चासत्राचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत, असे बापट यांनी सांगितले.

पालकांनी वेळ देणे आवश्यक!

*  मुख्याध्यापकांचे अधिकार सक्षम करण्याची गरज

*  पाल्याकडे पुरेसे लक्ष देण्यासाठी पालकांकडे वेळेचा अभाव

*  मुलाला चांगले गुण मिळावेत एवढीच पालकांची अपेक्षा

*  शाळांना मिळणारी तुटपुंजी सरकारी आर्थिक मदत

*  या साऱ्यांचा शाळांच्या दर्जावर होत असलेला विपरीत परिणाम