साथीच्या आजाराच्या प्रसारासाठीचे पूर्वविश्लेषण करण्याची साधने विकसित करून त्याद्वारे भविष्यात साथ आल्यास ती कशी पसरेल, वाहतूक सेवेद्वारे त्याचा प्रसार कसा होऊ  शकेल, कोणत्या शहरांत, शहरांतील कोणत्या भागात त्याचा अधिक परिणाम होऊ  शकेल या दृष्टीने गणितीय प्रारूप आणि साधने तयार केली जात असून ‘सेंटर फॉर मॉडेलिंग अ‍ॅण्ड सिम्युलेशन’च्या डॉ. भालचंद्र पुजारी आणि डॉ.स्नेहल शेकटकर यांची त्यासाठी राष्ट्रीय पातळीवर निवड झाली आहे.

करोना संसर्गाच्या पाश्र्वभूमीवर शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन इंडियन सायंटिस्ट्स रिस्पॉन्स टू कोविड-२०१९ हा समूह तयार केला आहे. त्यात चेन्नईची गणितीय विज्ञान संस्था, बंगळुरू येथील भारतीय विज्ञान संस्थेतील शास्त्रज्ञ आणि पुणे विद्यापीठातील शास्त्रज्ञ संचारबंदी उठवल्यानंतर काय घडू शकते या विषयावर काम करत आहेत.

संशोधनाची दखल..

‘सेंटर फॉर मॉडेलिंग अ‍ॅण्ड सिम्युलेशन’च्या डॉ. भालचंद्र पुजारी आणि डॉ.स्नेहल शेकटकर यांनी देशात संचारबंदी लागू होण्यापूर्वी साथीचा रोग कसा पसरेल याचे नवे गणितीय प्रारूप (मॉडेल) तयार करून साथीचे संक्रमण रोखण्यासाठी देशांतर्गत वाहतूक बंद करणे महत्त्वाचे आहे हे दाखवून दिले होते. त्याची दखल घेऊन अखिल भारतीय शास्त्रज्ञांच्या समूहात त्यांचा समावेश झाला आहे.

साथीचा आजार कसा पसरू शकतो याचे व्यापक गणितीय प्रारूप तयार करण्याचा प्रयत्न चेन्नईच्या गणितीय विज्ञान संस्थेच्या सहकार्याने केला जात आहे. त्यासाठी विषाणूसाथतज्ज्ञांचीही मदत घेण्यात येत आहे. याद्वारे व्यापक पावले उचलण्यासाठी धोरणकर्त्यांना मदत होईल. -डॉ. भालचंद्र पुजारी