पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील सांगवी वाहतूक पोलिसांनी चक्क सायकलवरून गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. अनेकदा पोलिसांच्या तब्बेतीविषयी शंका उपस्थित केली जात असताना सांगवी पोलिसांचा हा नवा उपक्रम शहरामध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

वाहतूक कोंडी होणाऱ्या परिसरामध्ये सहजपणे प्रवास करता यावा या उद्देशाने पोलिसांनी हा उपक्रम सुरु केला आहे. पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, सांगवी, नवी सांगवी, काळेवाडी या परिसरात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते. अनेकदा विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांना थांबवणं पोलिसांना अवघड होऊन बसतं. मात्र वाहतूक पोलीस सायकलवरून गस्त घालत असल्यापासून वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवणे सोप्पे झाले असून वाहतूक कोंडीला आळा बसला असल्याचे वाहतूक पोलीस निरीक्षक किशोर म्हसवडे यांनी ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना सांगितले आहे. नो पार्कींग, फुटपाथ पार्किंग, सायकल ट्रक पार्किंग, विरुद्ध दिशेने वाहन चालवणे यांच्यावर सध्या सायकल वापराने परिणाम झाला आहे. हा उपक्रम नवीन वर्षापासून सुरू करण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांनी शहरामध्ये अशाप्रकारे सायकलवरून गस्त घालण्याचा हा राज्यातील पाहिलाच प्रयोग आहे.

Tata Punch Car sale
टाटाच्या ‘या’ सर्वात स्वस्त SUV नं Wagon R, Dzire चं वर्चस्व संपवलं? झाली दणक्यात विक्री, मायलेज २६ किमी
NASA captures mysterious ‘surfboard-shaped’ object orbiting moon
चंद्राभोवती घिरट्या घालतेय UFO? नासाने शेअर केला रहस्यमयी फोटो, नक्की काय आहे प्रकरण?
Best Selling 7 Seater Car
Innova ना Fortuner मारुतीच्या ‘या’ स्वस्त ७ सीटर कारसमोर सर्वांची बोलती बंद; दणक्यात विक्री, मायलेज २६ किमी
ring of fire
विश्लेषण : भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे ‘रिंग ऑफ फायर’ नेमके कुठे आहे? या भागात सर्वाधिक भूकंप का होतात?

काही सामाजिक संस्थांनी सांगवी पोलिसांचा हा उपक्रम उचलून धरत त्यांना आत्तापर्यंत ३० सायकल दिल्या आहेत. तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये आणखी २२ सायकलची भर वाहतूक पोलिसांच्या या अनोख्या ताफ्यात पडणार आहे. वाहतूक पोलिसांना सायकलवर पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं, लहान लहान अंतरावर मोटरसायकलने जाणारे पोलीस आता १३ किलोमीटर पर्यंत गस्त घालताना दिसत आहेत. सकाळी आठ ते दहा आणि संध्याकाळी सहा ते आठ या वेळेत वाहतूक पोलीस सायकल वरून गस्त घालत असल्याचे पोलिसांनी सांगितले. वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्याबरोबरच सायकल चालवलण्याने ड्युटी अवर्समध्येच त्यांचा व्यायाम होतो आणि फिट राहण्यास मदत होताना दिसत आहे. चारचाकी आणि दुचाकीवर गस्त घालत असताना पोलिसांना अनेक अडचणी येतात. त्या समस्येवर सायकलवरील गस्त हा चांगला पर्याय असल्याचे मागील १५ दिवसांमध्ये दिसून आले आहे. सायकल वापरल्याने वायुप्रदूषण आणि ध्वनी प्रदूषणावर आळा बसतो. दोन अधिकारी आणि दहा कर्मचारी असा एकूण १२ जणांचा ताफा एका वेळेस गस्त घालतो. या सायकल पथकाने आत्तापर्यंत ३२ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.

तरी सायकल चालवतात…

पोलिसांना सायकलवर पाहून नागरिक स्वतः सायकल वापरत आहेत. नवनाथ चौधरी हे वाहतूक पोलीस कर्मचारी आहेत, त्यांचा काही वर्षांपूर्वी अपघातात पाय मोडला होता. ते सध्या लंगडत चालतात परंतु कर्तव्य बजावत असताना ते सायकल चालवतात त्यामुळे त्यांच या परिसरात कौतुक होत आहे. तर पूजा झावरे या देखील वाहतूक पोलीस कर्मचारी आहेत त्या गरोदर असताना देखील कर्तव्य बजावत आवडीने सायकल चालवत असल्याची माहिती माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक किशोर म्हसवडे यांनी दिली आहे. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून वाहतूक पोलिसांच्या फिटनेसवर नामी उपाय निघाल्याची चर्चा सध्या सांगवीमध्ये रंगताना दिसत आहे.