भारतीय जनता पक्षाबरोबर राज्यात सत्तेत असतानाही भाजपला विरोध करण्याची एकही संधी शिवसेनेकडून दवडली जात नाही. राज्याच्या सत्तेत असताना विरोधाचा पवित्रा शिवसेनेकडून घेतला जात असताना महापालिकेतील सत्तेत नसतानाही शहर शिवसेनेला मात्र असा पवित्रा अद्याप घेता आलेला नाही. पेट्रोल-डिझेल, तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीसह अन्य काही मुद्दय़ांवर शिवसेनेकडून आंदोलने करण्यात आली असली तरी त्यामध्ये आक्रमकता नव्हती. महापालिकेच्या सभागृहातही भाजपला कोंडीत पकडण्याची संधी शिवसेनेच्या नगरसेवकांना साधता येत नसल्याचे चित्र आहे.

विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात युती होऊ शकली नाही. विधानसभेची निवडणूक हे दोन्ही पक्ष स्वबळावर लढले. त्यानंतर राज्यात सत्ता स्थापनेसाठी दोन्ही पक्षात युती झाली, पण त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीतही भाजप-शिवसेनेने स्वत:ची ताकद आजमाविली. पुणे महापालिकेत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले. पुण्यात भाजपला ९८ जागा मिळाल्या आणि शिवसेनेचे नऊ उमेदवार निवडून आले.

मुंबईत युतीतील सत्तेत भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार दावे-प्रतिदावे सुरु आहेत. भाजपला कोंडीत पकडण्याची एकही संधी शिवसेना सोडत नाही. त्याउलट पुण्यात सत्तेमध्ये नसतानाही भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न शिवसेनेला जमत नसल्याचे दिसत आहे. महापालिकेच्या स्तरावर घेण्यात आलेले विविध निर्णय किंवा झालेल्या वादग्रस्त घटनांवर राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस पक्षाकडून सातत्याने आंदोलने केली जात आहेत. सभागृहातही त्याचे तीव्र पडसाद उमटल्याचे वेळोवेळी दिसते.

शिवसेनेच्या कार्यकारिणीमध्ये काही महिन्यांपूर्वी बदल करण्यात आले. माजी आमदार चंद्रकांत मोकाटे आणि महादेव बाबर यांना शहर प्रमुख पदाची जबाबदारी विभागून देण्यात आली. शहरातील आठ विधानसभा मतदार संघापैकी या दोघांकडे प्रत्येकी चार-चार मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. एका बाजूला विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपवर जो हल्लाबोल होत आहे तो पहाता विरोधी पक्षात असून शहर शिवसेनेला तेवढी आक्रमक भूमिका घेता येत नसल्याचे चित्र आहे.

दरम्यान, शिवसेनेचे दोन्ही शहर प्रमुख चंद्रकांत मोकाटे आणि महादेव बाबर यांनी हा दावा खोडून काढला. पुण्यात भाजपला पाशवी बहुमत आहे. त्या तुलनेत महापालिकेत शिवसेनेचे संख्याबळ कमी आहे. पण पेट्रोल-डिझेल दरवाढ, अन्नधान्याच्या किमतींमध्ये झालेली वाढ, चांदणी चौकातील प्रस्तावित उड्डाणपुलाच्या कामाला होत असलेली दिरंगाई अशा काही मुद्दय़ांवर शिवसेनेकडून आंदोलने करण्यात आली. नागरी हिताच्या प्रश्नावर शिवसेनेकडून सातत्याने आवाज उठविला जात आहे. शिवसृष्टी असो किंवा बीडीपीचा मुद्दा असो, शिवसेनेकडून स्पष्ट भूमिका घेण्यात आली आहे, असे चंद्रकांत मोकाटे यांनी सांगितले.

महादेव बाबर म्हणाले,की  शहराचा विचार करता पुण्यातही शिवसेनेकडून आक्रमकपणे बाजू मांडली जात आहे. शहर पातळीवर सातत्याने आंदोलने हाती घेण्यात आली आहेत. शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होत आहेत. येत्या काही दिवसांमध्ये आंदोलनाची धार आणखी तीव्र करण्यात येणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीतही शहरातील चित्र बदलून  शिवसेनेचे शहरात वर्चस्व निर्माण झाल्याचे दिसून येईल.